गोवा 

कोविडबाधित महिलेचा इस्पितळाबाहेर मृत्यू

मडगाव :
बेताळभाटी येथील कोरोनाबाधित एका ४९ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सकाळी ६च्या दरम्यान दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आले होते. मात्र, सकाळी ११ वाजेपर्यंत उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने अखेर त्या महिलेचा गाडीतच मृत्यू झाला. बेताळभाटी सरपंच कोस्तांसिओ मिरांडा यांनी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
बेताळभाटी येथील महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने त्या महिलेने मडगाव येथील एका खासगी इस्पितळात सोमवारी दुपारी १च्या सुमारास करोनाची चाचणी केली होती. मात्र, मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागताच तिच्या पतीने बेताळभाटी सरपंचांना फोन केल्यावर त्यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिलेला गाडीतून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी त्या महिलेच्या पतीने सर्वांना विनंती केली. मात्र, कुणीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याने तपासणी केलेल्या इस्पितळाला कॉल करून अहवालाबाबत चौकशी केल्यानंतर महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.
बेताळभाटी येथील घटनेबाबत आमदार विल्फ्रेड डिसा यांनी सदर कुटुंबीयांना मृत्यू प्रमाणपत्रासाठी मदत केली. याबाबत आमदार डिसा यांना विचारणा केली असता, सध्याच्या करोना महामारीच्या कालावधीत लोकांना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाबाहेर पाच तास राहून महिलेचा झालेला मृत्यू ही घटना दुर्दैवी आहे. इस्पितळाच्या इमारतीतील वरचे दोन रिक्त मजले आरोग्य सुविधांसाठी वापरणे गरजेचे असल्याचे मत आमदार डिसा यांनी व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: