गोवा 

‘राजकीय सहानुभूतीसाठी भाजप घालतेय कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात’

कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली बोचरी टीका 

पणजी:
भारतीय जनता पार्टीने (BJP) आपली विश्वासार्हता व संवेदनशीलता हरवली असुन, आपल्याच कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले व निधन पावलेल्यांना श्रद्धांजली वाहणे हे सुद्धा भाजपाला उत्साही वातावरणात साजरा करण्याचा ‘कार्यक्रम’ वाटतो अशी बोचरी टिका कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. आज देश संकटात असताना, बंगालमध्ये झालेल्या दारुण पराभवाने वैफल्यग्रस्त झालेला भाजप राजकीय सहानभूती मिळविण्यासाठी देशभर धरणे आयोजित करुन आपल्याच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. भाजपची सत्तेची हाव अत्यंत खालच्या स्तराला पोचली असल्याचे पणजीकर यांनी सांगितले.
म्हापसा येथे भाजपने आयोजित केलेल्या धरण्याच्या वेळी पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी भाजपने असे कार्यक्रम संपुर्ण देशात आयोजित केल्याचे वक्तव्य केले होते, त्याचा समाचार घेताना अमरनाथ पणजीकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
गोव्याच्या सुपर मुख्यमंत्र्यानी भाजपच्या कार्यकर्त्यांना १४४ कलम व कोविडचे नियम मोडून दहा लोकांना एकत्र जमण्याची खास परवानगी दिली होती का? असा प्रश्न अमरनाथ पणजीकर यांनी विचारला आहे. गोव्याच्या पोलिस अधिक्षकांनी ताबडतोब  तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांविरूद्ध गुन्हा नोंद करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजपच्या बेजबाबदारपणामुळे आज पर्यंत गोव्यात १४४३ कोविडचे बळी गेले आहेत. परंतु त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकही भाजप कार्यकर्ता पुढे आला नाही. मदतीची याचना करणारे कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी सहकार्य करण्यासाठी भाजपचा एक ही सदस्य येत नाही हे दुर्देवी असल्याचे त्यांनी नोंदवले.
पणजीच्या माजी आमदाराने गोव्यात कोविड रूग्णांसाठी अखंड ऑक्सिजन पुरवठा, औषधे, लस तसेच खाटा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आमरण उपोषणाला बसण्याची हिम्मत दाखवावी असे आव्हान अमरनाथ पणजीकर यांनी दिले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: