Rashtramat

कोरोनाच्या आकड्यांचा खेळ

विजय चोरमारे

करोनाच्या संकटाच्या काळात चहुबाजूंनी काळजी वाढवणा-या बातम्या येत असताना प्रसारमाध्यमांतून अधिक भीतीदायक पद्धतीने बातम्या दिल्या जातात. लोकांना दिलासा देण्याऐवजी भीतीदायक वातावरण निर्माण केले जाते. करोनाच्या रुग्णांच्या बाबतीत आणि मृतांच्या बाबतीतही महाराष्ट्रातील आकडे सर्वात मोठे आहेत, परंतु मुंबई किंवा महाराष्ट्रातली परिस्थिती गुजरातइतकी भीषण नाही हेही लक्षात घ्यायला हवे. करोना रुग्णांच्या आकड्यांचा जो खेळ रोजच्या रोज समोर येतो त्यातूनही काही गोष्टी दिलासायक करता येऊ शकतात. परंतु बातमीचा आवाज अधिक वाढायचा असेल तर आकडाही मोठा लागतो. महाराष्ट्रात ५६ हजार करोनाचे रुग्ण आहेत, असं म्हटलं तर कुणाचीही छाती दडपून जाऊ शकते. परंतु हाच आकडा ३७ हजार असा सांगितला तर दडपण काहीअंशी कमी होऊ शकते. कारण ५६ आणि ३७ यामधले अंतर खूप मोठे आहे. आणि साडेअकरा कोटींच्या महाराष्ट्रात ३७ हजार या आकड्याचे तेवढे दडपण वाटत नाही. आकडा पन्नासच्या घरात गेला तर आपोआप त्याची तीव्रता वाढल्यासारखी वाटते. सध्या करोनाच्या रुग्णांच्या आकड्याचे तसेच झाले आहे. प्रचलित पद्धतीनुसार करोनाच्या आजवरच्या रुग्णांचा आकडा एकुणात सांगितला जातो. आणि तोच हायलाईट केला जातो. पुढे तपशील असतो, परंतु तपशीलात जाणारे लोक फार कमी असतात. वरवरचा ठळक आकडा पाहून अनुमान बांधणारेच जास्ती असतात.

खरेतर सध्याच्या संवेदनशील काळामध्ये माध्यमांनी विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अधिक जबाबदारीने काम करायला पाहिजे. परंतु ती अपेक्षा फोल ठरताना दिसते आहे. सुरुवातीला करोनासंदर्भात निर्माण केलेले भीतीचे वातावरण, नंतर मरकजवरून धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण, पुढे आकड्यांची इर्षा आणि त्यापुढे जाऊन आणखी एक धक्कादायक बातमी सांगण्याच्या प्रयत्नात केली जाणारी शब्दांची कुतरओढ हे सगळे त्रासदायक ठरते.
मूळ मुद्दा आहे रुग्णांच्या आकडेवारीचा. केंद्रसरकारने सुरुवातीला आंतरराष्ट्रीय विमाने आणि त्यातील प्रवाशांसंदर्भात घेतलेले कचखाऊ धोरण, विमानतळांवर दाखवला गेलेला ढिसाळपणा यामुळे मुंबईत आणि महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत करोना अधिक वेगाने पसरला. सव्वा कोटींच्या मुंबईतला साठ टक्के भाग झोपडपट्ट्यांचा आहे. म्हणजे मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या सुमारे ७५ लाख आहे. एवढ्या प्रचंड लोकसंख्येला फिजिकल डिस्टन्सिंगची कोणत्याही पातळीवरची सोय नाही. घरात राहिले तरीही शारीरिक अंतर ठेवता येत नाही आणि घराचा उंबरा ओलांडून अंगणात आले तरी या डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो अशी वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये करोनाने मुंबईत आणि विशेषतः झोपडपडपट्ट्यांमध्ये शिरकाव केल्यानंतर त्याला कुणीच रोखू शकत नव्हते, ही वस्तुस्थिती लक्षात घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या रुग्णांचा आकडा सांगितला जातो तो ३४ हजारांचा. प्रत्यक्षात करोनाचे रुग्ण आहेत २४ हजार. मुंबईत आजवर एक हजारावर रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ही चिंता वाढवणारी बाब असली तरी आजवर मुंबईत साडेआठ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, ही दिलासादाय बाबही लक्षात घ्यायला पाहिजे. सव्वा कोटींच्या आणि त्यातही ७५ लाख झोपडपडपट्टीवासीय असलेल्या या शहरात कालच्या तारखेला २४ हजार रुग्ण होते. हा आकडा चिंताजनक मानायचा की, दिलासादायक हे व्यक्तिसापेक्ष आहे. मुंबईत करोनाचा प्रसार वाढतोय हे खरे असले तरी त्याला रोखण्यात इथल्या यंत्रणेने चांगले यश मिळवले आहे,असेही म्हणता येऊ शकते.

राज्य सरकारच्यावतीने दररोज जी आकडेवारी जाहीर केली जाते, त्यातील एकूण रुग्णांचा जो आकडा प्रसारमाध्यमे हायलाइट करतात तो आजवर लागण झालेल्या एकूण रुग्णांचा असतो. त्यातील एक तृतीयांश बरे होऊन घरी गेलेले असतात. त्यांचा उल्लेख बातमीत कुठेतरी खाली असतो. त्यामुळे लोकांपुढे जाणारा आकडा प्रामुख्याने आतापर्यंतच्या एकूण रुग्णांचा असतो. म्हणजे मुंबईत ३४ हजार रुग्ण सांगितले जाते, तेव्हा त्यातील १० हजार बरे होऊन घरी गेलेले असतात. म्हणजे प्रत्यक्षात २४ हजार रुग्ण असतात. आणखी एक दिलासादायक बाब सांगायची म्हणजे राज्याचा रुग्णदुपटीचा वेग मागच्या आठवड्यात ११.५ दिवस होता, तो आज १४.७ दिवस झाला आहे.
किती रुग्ण म्हणजे कमी आणि किती रुग्ण म्हणजे जास्त अशी काही फुटपट्टी नाही. एका रुग्णाची हलगर्जीही समाजासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे एक रुग्ण असणेही चिंताजनक असते. परंतु आता नजिकच्या भविष्यात करोनामुक्तीची वगैरे गाणी म्हणण्यासारखा भाबडेपणा दुसरा कुठला असू शकत नाही. करोनाचे रुग्ण सापडत राहणार. मुंबईतच नव्हे,तर गावोगावी सापडत राहणार आहेत. गावोगावच्या पत्रकारांनी लॉटरी फुटल्यासारखा तो व्हाट्सअपवरून सगळीकडे पसरवण्यात किंवा करोनाच्या आकड्याचा व्हाट्सअप स्टेटस ठेवण्यात कसलाच शहाणपणा नाही. यापुढील काळात अचानक कुठेतरी समूह संसर्ग होऊन काळजीचे वातावरणही होणार. परंतु उगाच करोना करोना करून दंगा करण्यात काही अर्थ नाही. त्यासाठीची उपाययोजना आणि वैद्यकीय सज्जता तालुकाच नव्हे, तर गावपातळीवर असणे महत्त्वाची आहे. त्याजोडीने समाजाचे प्रबोधन गरजेचे आहे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि शारीरिक अंतर ठेवणे या गोष्टी सवयीच्या कराव्या लागतील. करोना येत-जात राहील. त्याच्यासह जगण्याची सवय करूनच पुढचे मार्गक्रमण करीत राहावे लागणार आहे.

(लेखकाच्या फेसबुक वॉलवरून साभार)

हे वाचलंत का?

सुशांत : व्यवस्थेचा बळी 

Rashtramat

राजनैतिक सुत्रपाताची सुरुवात…!

Rashtramat

साहित्यिक ‘टिंबां’ची मर्मग्राही गोष्ट

Rashtramat

Leave a Comment