Rashtramat

मधुमेहींना कोरोनाचा जास्त धोका…

  • डॉ. महेश चव्हाण

भारतात मधुमेहींची संख्या इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनच्या माहितीनुसार, भारतात २०१९ साली ७.२९ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त होते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, भारतात ५.८ टक्के महिला आणि ८ टक्के पुरुष मधुमेहाने ग्रस्त होते. तर, द लॅन्सेटच्या माहितीनुसार, २०३० पर्यंत भारतातील मधुमेहींची संख्या ९८ दशलक्ष होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशातील मधुमेहींच्या संख्येतील ८ते १० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
संपूर्ण देशातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असतानाच वाढत्या आकडेवारीमुळे आज भारत कोव्हिडचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या  क्रमांकावर आला आहे. पर्यायाने आपल्या सर्वांना असलेला धोकाही वाढत आहे. हे लक्षात घेता, आता आपण सर्वांनी काळजी घेण्याची जास्त मोठी गरज निर्माण झाली असून ज्यांना जास्त धोका आहे त्यांच्याकडे विशेष लक्ष देणेही महत्त्वाचे झाले आहे. करोना विषाणू सार्स-सीओव्ही-२ मुळे होणाऱ्या कोव्हिड- १९ मध्ये खोकला, ताप, स्नायूदुखी, श्वसनाशी संबंधित समस्या उदा. न्यूमोनिया आणि श्वसनमार्ग निकामी होणे अशी लक्षणे दिसून येतात. हा आजार कोणत्याही वयोगटाला होऊ शकत असला, तरी वृद्धांना विशेषतः मधुमेहासारख्या समस्या असणाऱ्यांना याचा जास्त धोका आहे.
विविध अहवालांनुसार कोव्हिड- १९ आणि मधुमेहामध्ये द्वय- दिशात्मक संबंध आहे आणि त्यामुळे एकंदरीत धोका तसेच मृत्यूची शक्यता वाढते. एका अभ्यासात मांडण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार कोव्हिड- १९ मुळे मृत्यू झालेल्यांपैकी अंदाजे २०-३० टक्के लोकांना मधुमेह असतो. शास्त्रज्ञांनी असेही सांगितले आहे, की नोवेल करोनाविषाणूमुळे ग्लुकोज पचनात बदल होऊ शकतात व त्यामुळे आधीपासून असलेल्या मधुमेहाची स्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते किंवा त्यातून आजारात नवे पैलू दिसून येऊ शकतात. या दोन्ही आजारांचे स्वरुप लक्षात घेता भारतात त्याविषयी जागरूकता निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशात या आजाराचा सामना करण्यासाठी त्यात समाविष्ट असलेल्या जोखमी समजून घेणे गरजेचे आहे. ही जोखीम दोन घटकांमध्ये विभागलेली आहे
– प्रतिकारशक्ती आणि ग्लुकोजची पातळी व शारीरिक मर्यादा.

या विषाणूच्या लक्षणांच्या अभ्यासानुसार त्यांचा रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. हा संसर्गजन्य स्वरुपाचा असून इतर जंतू संसर्गांप्रमाणे आणि श्वसन आजारांप्रमाणे पसरतो. हायपरग्लेसेमियामुळे मधुमेही रुग्णांच्या प्रतिकार शक्तीमध्ये बिघाड होत असल्यामुळे त्यांना संसर्ग आणि इतर गुंतागुंतींचा जास्त धोका असतो. म्हणूनच रुग्णांना या विषाणूचा सामना करणे जास्त अवघड होते तसेच बरं होण्यासाठी त्यांना जास्त वेळही लागतो.

कोरोनाग्रस्त मधुमेहींच्या मृत्यूमागची कारणं ?
•         डायबेटिसवर अजिबात नियंत्रण नसणे (Uncontrolled Disbates)
•         मधुमेहींची कमी असणारी रोगप्रतिकारक शक्ती
•         शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची कमी झालेली क्षमता

मधुमेहींनी काय काळजी घ्यावी?
•         मधुमेहींनी आपलं अन्न दुसऱ्यांसोबत शेअर करू नये
•      हात धुतल्याशिवाय चेहऱ्याला हात लावू नये. आपल्या आजूबाजूच्या परिसराचं सतत निर्जंतुकीकरण करावं
•        खोकला, कफ असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा
•         शरीरातील सारखेच्या प्रमाणावर लक्ष ठेवा.
•         पौष्टीक अन्नाचं सेवन करा

मधुमेहींनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर लक्ष दिलं पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने व्हायरस मोठ्या संख्येने पसरतो. त्याचसोबत पौष्टीक अन्नाचं सेवन आणि व्यायाम केला पाहिजे. जेणेकरून, शरीरातील साखरेच्या प्रमाणावर योग्य नियंत्रण राहील.

(लेखक अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई  येथे  एंडोक्रिनोलॉजी सल्लागार आहेत.)

हे वाचलंत का?

एका कुटुंबनियोजनाची पन्नाशी

Rashtramat

लॉकडाऊनचा फटका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक

Rashtramat

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

Rashtramat

Leave a Comment