Rashtramat

साहित्यिक ‘टिंबां’ची मर्मग्राही गोष्ट

  • डॉ. सयाजी पगार

पोकळ असो वा भरीव ‘टिंब’च्या विश्वात- विश्वाच्या परिघात वावरणारे जुनियर लेखक असो की सिनियर, साहित्यकुंज असो की विश्‍वकुंज, विचारकुंज असो की आस्वादकुंज वा गोष्टी लेखकांच्या असोत; या सगळ्या गोष्टींचे सूत्रधार आहेत वास्तवातले मातीचे पाय असणारे लेखक- कलावंत. पैकी काही आरशात आपले प्रतिबिंब न्याहाळणारे वगैरे… या आणि अशा सूत्रानुसार पाहिले तर या केवळ भिन्न कथा नाहीत, एकमेकांत गुंतलेल्या अनेक कथांची कोलाज होत ही कादंबरी आकाराला येते.
या कथा-कादंबरीला चितारणारे, जन्माला घालणारे, रसिकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडणारे लेखक डॉ. सुधीर देवरे हे बहुरंगी, बहुरूपी, बहुढंगी, बहुविचारी व बहुआयामी असे व्यक्तीमत्व आहे. ‘रंगात रंगुनी रंग माझा वेगळा’ असे त्यांचे भावविश्‍व आहे. ते भाषा, कला, लोकजीवन लोकवाड्‍.मयाचे अभ्यासक- संशोधक असून त्यांचे वास्तववादी कादंबरी लिखाणही तितक्याच ताकदीनिशी पुढे येत आहे. ‘मी गोष्टीत मावत नाही’ सारखीच ‘टिंब’ ही सुध्दा प्रायोगिक कादंबरी आहे.
कादंबरीचा कथानुक्रम पाहिला तर तिच्यात सात भागांचा सुंदर गोफ बेमालूमपणे गुंफलेला दिसतो. पहिला भाग ‘ज्युले सिले लेखक बिखक’ हा नऊ कथांचा गुच्छ. त्यातले अशोक पाटील हे नायक प्राध्यापक नाहीत. कार्पोरेट कंपनीत ते कामगार आहेत. म्हणून त्यांनी साहित्यिकांवर लिहू नये? विद्यापीठीय क्षेत्रावर बोलू नये? प्राध्यापकांवर टीका करू नये? त्यांनी लिहिलेले कोणी वाचू नये? असे प्रश्न उपस्थित करून त्यांची साहित्यक्षेत्रात होणारी उपरेपणाची घुसमट अधोरेखित केली जाते.
नऊ कथांच्या जुगलबंदीत ज्युनियर सिनियर आपापल्या कोषात कसे हरवलेले असतात याचं दर्शन घडतं. या जुगलबंदीत लेखकांच्या मानसिकतेचा खेळ मजेशीर आला आहे. सर्व जगाचे आपण ‘सर्वज्ञ’ असल्याचा भास दाखवत सिनियर ज्युनिअरचा विसंवाद कथांतून उपयोजित होत राहतो. अशा सगळ्याच कथांचं चित्रण शब्दांच्या अर्कचित्रातून कादंबरीभर बोलतं. मक्तेदारी, सृजनाचा व्यायाम, कवी केविलवाणा, पाहून मोठे वाटत नाही आदी सुट्या कथा जबरदस्त. साहित्य आणि साहित्यिक यांच्या विविध अंगांचा परामर्श या कादंबरीतून घेतला जातो.

दुसऱ्या भागात लेखकांवर स्वतंत्र गोष्टी आहेत. गोष्टींचा कळप करून त्या त्या भागात लेखक लिहितात. कादंबरीतले पात्र अशोक पाटील यांच्या मूळ चिंतनाचा विषय साहित्यविश्व आहे. ‘गोष्ट संपादकाची’ कथेत सत्तास्थान आणि संपादकांचा अधिकारी अहम वगैरे चर्चा- संवाद कथेत प्रमुख होत जातात. लेखकाच्या निरीक्षण शक्‍तीचा आवाका मोठा आहे. साहित्यिक जीवन विश्वाचे प्रतिबिंब लेखकाच्या मेंदू रूपी आरशात सूक्ष्मतेने ठसठशीतपणे चित्रित होते. ‘झोप स्पेशालिस्ट’ ह्या कथेतील विचारांत लेखकाने निर्माण केलेल्या वर्तुळाच्या कक्षा वाढत जातात. डॉक्टर आणि लेखक यांची जुगलबंदी येथे मजेशीर आणि विनोदी अंगाने आलेली आहे. अखिल मानवी मनाचा बहुरंगी खेळ या कथेत जमून आला.
आणखी एका कथेत ‘बाबा’तल्या सर्वज्ञाचं दर्शन घडतं. कोणत्याही छोट्यामोठ्या विषयात ते आपले डोके खूपसतात आणि आपला ठसा मागे ठेवण्याचा केविलवाना प्रयत्न करतात. त्यांच्या पुढे बाकीचे सारे बेअक्कल ठरतात. माणसं तुटत गेली तरी तिय्यम लेखकाच्या शैलीचा पीळ बाबांच्या व्यक्तिमत्वात आजही हास्यास्पदरित्या कायम राहतो, हे या कथेचं अंतिम सत्य.
टिंब कादंबरी लेखनातला तिसरा भाग साहित्य कुंज. लेखकांची विविध रूपे, स्वगते, म्हणजे या कथा नाहीत, असं नाही. ही स्वगते कादंबरीचे सूत्र पुढे चालवत राहतात. पूर्वीच्या काळी गावात लोकांचे मनोरंजन करणारे भोवाडा, कलापथक, नकलाकार, गारुडी, डोंबारी असे एक ना अनेक कार्यक्रम गाव पातळीवर होत असत. त्यातून गाव पुढाऱ्यांना प्रसिद्धीचा मानाचा तुरा मिळत असे. अलीकडे मात्र त्यांची जागा साहित्य संमेलनांनी घेतली. साहित्य संमेलनातून प्रसिद्धी आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी साध्य होतात, असं कादंबरीत विस्तृत विवेचन येतं. कळपांच्या कळपात साहित्य संमेलन, विश्व कुंजातले वैश्विक साहित्य संमेलन आदी चर्चेत नायक अशोक पाटलांची झालेली घालमेल हा चिंतनीय विषय कादंबरी अधोरेखित करीते. कोणी प्राध्यापक आयुष्यभर इतरांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहीत राहतो आणि पुस्तकाच्या प्रस्तावनांचे शेवटी एक आपलं पुस्तक काढतो, असेही काही मजेशीर विषय कादंबरीत आहेत. संमेलनातल्या पालखी मिरवणूकीचं चित्रणही असंच. व्यासपीठावरच्या फोटोंसाठी पळणे, भाषणांसाठी माईक हिसकावणे, प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणे, मध्येच मान काढून आपला चेहरा दाखवून प्रकाशित होणे, संमेलनातल्या जेवणासाठी पळणे अशा पध्दतीने काही सुसंवाद आणि अनेक विसंवाद, प्रकाशक, पुरस्कार, भाषा विषयीचं कोणाचं मत, वाचन संस्कृती आदी गोष्टी वेगवेगळ्या कथांमधून वेगवेगळं भावदर्शन घडवतात. हे सर्व अचूक व प्रभावीपणे कलात्मक होत कादंबरीत टिपलं गेलं. कादंबरी लेखकाच्या लेखणीची ही किमया आहे. एकामागे एक घटनांचं सूत्र एकमेकांमध्ये गुंतवून सुट्या कथा व्यामिश्र होत कादंबरीचा पिळ कसा घट्ट होत जातो, ते वाचकाच्या लक्षात येत नाही. वाचक फक्त पुढे काय? पुढे काय? अशा विचारकुंजात गुंतून राहतो.
सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक विलास सारंग यांच्या ‘सोलेदाद’ या मराठी कथासंग्रहातील टेलिफोनवर आधारीत एक कथा कादंबरीत उपयोजित होते. कथेच्या आस्वादातही जा‍णीवपूर्वक संवाद आणि विसंवाद यांचं दर्शन घडतं. कलावंताच्या वा साहित्यिकाच्या जीवन जाणिवा त्याच्या साहित्याच्या निर्मितीवेळा- कळा अगदी सहजपणे उपयोजित होत जातात. ‘टिंब’ कलाकृतीतील कथा अस्सल अनुभूतीतून येत असल्यामुळे सार्वत्रिक, व्यामिश्र व कालाय ठरतात. त्या काळाच्या कसोटीवर पुढे टिकून पुरून उरतील. कादंबरीत शेवटच्या भागात अशोक पाटील लिखाणापेक्षा कलाकृतीचा आस्वाद घ्यायला प्राधान्य देतात. गंभीर- वैचारिक लिखाण वाचतात. निर्मितीपेक्षा आस्वादात मन जास्त रमतं, असं उव्दिग्नपणे सांगण्याचा हा प्रयत्न असावा का? कादंबरीचं अशा विविध विभागात चिंतनाचं जाळं विणलं गेलं आहे. ‘साहित्यक्षेत्र हे परंपरेने पवित्र समजलं जातं आणि ते तसंच पवित्र असायला हवं. पण तशी वस्तुस्थिती नाही!’, असं हा नायक इथं मनस्तापाने उव्दिग्नतेने व्यक्‍त होतो. ‘आपल्यासारखे असे अनेक टिंब या क्षेत्रात दुर्लक्षिले जातात’, ही वेदना नायक अधोरेखित करतो.

डॉ. सुधीर देवरे मिथकांच्या पातळीवरून या कथांतले अंतर्विरोधांचे दर्शन घडवत साहित्य क्षेत्रातलं विविधांगी चित्र सूक्ष्म दृष्टीने टिपतात. यात लेखक-कवी, ज्युनियर सिनियर साहित्यिक, साहित्य संमेलने, साहित्याच्या विविध ‘कार्यक्रमांवर’ उजेड टाकला आहे. लेखक आणि त्यांच्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडी व मनामनाचा विरोध, जुळवणी या सूत्रावर फिरणारी ही कथा मनाच्या वैश्विक जगात एक स्वतंत्र भावविश्व साकारते, हेच या कादंबरीचे यश आहे. युगप्रवर्तक, नवोन्मेशशालिनी, क्रांतिकारक आदी विचार सूत्र प्रसवणारी, बहुआयामी आणि कादंबरी या वाड्‍.मय प्रकाराला नवा आयाम देणारी अशी अखंड प्रवाहीत विचारधारेची ही कलाकृती आहे. यातल्या कुठल्या कथेच्या कथानकाने कोणी, एखादं कथन आपल्या अंगावर घेऊन दुखावलं तर जाणार नाही ना, अशी शंका आली. पण नाही. असं या कादंबरीत आक्षेपार्ह काहीही नाही. चित्रकार किशोर अर्जुन यांनी अशाच वर्तुळाकार टिंबांचा पुंजका देऊन कादंबरीला बोलतं केलं.

पुस्तक : टिंब
लेखक: डॉ. सुधीर रा. देवरे
मुखपृष्ठ: किशोर अर्जुन
प्रकाशन: सहित प्रकाशन, गोवा
पृष्ठ संख्या: १९४
किंमत: २०० रूपये

(पूर्वप्रकाशन : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी)

हे वाचलंत का?

‘रमेश घाडींची कविता इथल्या मातीत रुजलेली’

Rashtramat

महिला अत्याचाराला लघुपटातून ‘रेसिस्ट’

Rashtramat

वारी (कविता)

Rashtramat

Leave a Comment