Rashtramat

रंगला कोंकणी ‘काव्या एपीलॉग’

पणजी :
‘माझी कविता ही गावाच्या कोंकणी मातीतच खर्‍या अर्थाने रुजते, फुलते. व्यवसायासाठी जरी मी इतरत्र जात असलो तरी, गावाची ओढ सदोदित माझ्यामध्ये असते, त्यामुळे जर मला नेहमीच वाटते की, माझा पुर्नजन्म याच कोंकणी मातीमध्ये वारंवार व्हावा, एवढा मी या मातीसोबत, गावासोबत तादात्म पावलो आहे.’ अशा शब्दांत प्रसिध्द कवी आणि उद्योजक उदय म्हांब्रो यांनी आपल्या कवितेमागच्या तरल भावना व्यक्त केल्या. प्रसिध्द पत्रकार, सिनेइतिहासक, समीक्षक आणि साहित्यदर्दी भावना सोमय्या संयोजित ‘काव्या’ हा पॉडकास्ट त्यांच्या एपीलॉग संकेतस्थळावर नुकताच रंगला होता, त्यामध्ये ते बोलत होते.
विविध भारतीय भाषांतील मान्यवर कवी, कवयित्रींना निमंत्रित करत त्यांचे काव्यवाचन आणि त्यातून त्यांच्या भाषेचे, कवितेचे सौदर्यं श्रोत्यांना समजून सांगण्याच्या या कार्यक्रमात प्रसिध्द कोंकणी कवी उदय म्हांब्रो यांना नुकतेच निमंत्रित करण्यात आले होते. सुमारे अर्ध्या तासाच्या या ओघवत्या श्राव्य कार्यक्रमात उदय म्हांब्रो यांनी सुरुवातीलाच कोंकणी भाषेचे एकूण भारतीय भाषांमध्ये असलेले अनन्यसाधारण स्थान आणि वेगळेपण तपशीलवार विशद केले. त्यांच्या या माहितीमुळे भावना सोमय्या यांनीदेखील आपल्याला कोंकणीबद्दल अपवादात्मक माहिती असल्याचे नमूद केले. उदय म्हांब्रो यांनी यावेळी पोर्तुगीज काळापासूनचा एकूण कोंकणी भाषेचा इतिहास आणि त्यानंतर गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर कोंकणीचा झालेला राजकिय तथा साहित्यिक प्रवास आणि संघर्ष अत्यंत मुद्देसूदपणे मांडला. यामुळे बिगरकोंकणी श्रोत्यांनादेखील कोंकणी भाषेची महती आणि माहिती कळाली.
यावेळी उदय म्हांब्रो यांनी आपल्या काही कविता श्रोत्यांना मूळ कोंकणीतून लयबध्दपध्दतीने ऐकवल्या. त्याचसोबत या कवितांचा भावार्थ हिंदीमध्येही सांगण्यात आला. देशविदेशांतून या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला असून, अद्यापही https://www.eplog.media/kaavya/feat-udaymahambre/ या लिंकवर क्लिक केल्यास या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांना आवर्जून घेता येणार आहे. ‘काव्या’च्या मंचावर मला कोंकणीचे प्रतिनिधित्व करता आले आणि भावनाजींसोबत कोंकणी भाषा तथा कवितेबद्दल चर्चा करता आली ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि महत्वाची बाब आहे. राष्ट्रीय पातळीवर कोंकणी भाषेबद्दल जेवढी सजगता विविध माध्यमातून करता येईल, तेवढी आपण नेहमीच केली पाहिजे. त्यामुळेच आपल्या भाषेचा विकास आणि विस्तार सकारात्मकतेने होऊ शकतो.
– उदय म्हांब्रो,
प्रसिध्द कोंकणी कवी

हे वाचलंत का?

‘गोव्यात समूह संसर्ग झालेला नाही’

Rashtramat

ऑनलाईन करा ‘ब्रीथ अ‍ॅण्ड मेडिएशन’

Rashtramat

‘नेत्रदानाबद्दल राज्यात जागृती करणार’

Rashtramat

Leave a Comment