किशोर अर्जुन
पणजी :
महामारी, महासंकट, महायुद्ध यामुळे मोठ्याप्रमाणात जीवितहानी होतेच पण त्याचवेळेला याच काळात संवेदनशील व्यक्तींवरही या सगळ्यांचा परिणाम होतो. आणि त्यातूनच विविध कलाप्रकारांमध्ये मोलाची भर पडलेली आपल्याला इतिहासात दिसते. शतकभरापूर्वी कॉलराच्या साथीमुळे जग मेटाकुटीला आले, त्याचवेळेला ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ सारखी कादंबरी लिहिली गेली. आता करोनालाही अशाचप्रकारे जगभरात विविध कथा, कादंबरी, लघुपट, चित्रकला आदी कलाप्रकारांमध्ये सादर होत आले. त्याचवेळेला सध्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रिशा हेडाऊ या अवघ्या नऊ वर्षाच्या मराठमोळ्या लहानगीने ‘पॅनडॅमिक 2020 : अ 9 इअर ओल्डस् पर्स्पेक्टिव्ह’ हे पुस्तक लिहिले आहे.
प्रिशाचे आई-बाबा दोघेही महाराष्ट्रीयन. तिचा जन्म नागपुरात झाला. आणि सहा वर्षांपूर्वी हे दांपत्य तीन वर्षांच्या प्रिशासह नागपुरातून जाऊन अमेरिकेत स्थायिक झाले. तिचे बाबा राज हेडाऊ प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. प्रिशाला तिच्या पालकांनी लहानपणापासूनच सृजनात्मक वातावरणात वाढवले. प्रिशा शास्त्रीय ते हिपहॉप अशा विविध प्रकारचे नृत्य लीलया करते. जोडीला ती या वयातच राज्य आणि राष्ट्रपातळीवरील अव्वल बुद्धिबळपटू आहे. तिला जल तरणाची आणि योगाचीही विशेष आवड आहे. अशा स्थितीत करोनामुळे ती जेव्हा काही महिने घरातच ’लॉकडाऊन’ झाली तेव्हा तिने आपल्या सगळ्या भावना शब्दबद्ध केल्या.
लवकरच भारतातही उपलब्ध होणार पुस्तक
अमेरिकेतील प्रसिद्ध ‘बुकबेबी’ प्रकाशनाने प्रिशाचे ‘पॅनडॅमिक 2020’ प्रकाशित केले. सध्या फक्त अमेरिकेमध्येच वितरित होत आहे. तर ई बुकस्वरुपातील पुस्तकाला जगभरातील वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. यामुळे या दोन्ही प्रकारांमध्ये ‘पॅनडॅमिक :2020’ने अल्पावधीतच ‘अॅमेझॉन’च्या ‘बेस्ट सेलर’ यादीमध्ये मानाचे स्थान पटकावले आहे. लवकरच या पुस्तकाची भारतीय आवृत्तीदेखील प्रकाशित होणार असून, याच्या मराठी अनुवादाबद्दलही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
’पुस्तकासाठी नव्हतेच केले लिखाण’
आपण पुस्तक लिहितोय हे प्रिशाला सुरुवातीला माहीतच नव्हते, कारण तोपर्यंत ती नेहमीच्या सवयीनुसार ’दिसामाजी काहीतरी’ लिहीत होती. पण जेव्हा ती करोनाकाळावर गांभीर्याने टिपण काढते आहे, हे आईला कळाले तेव्हा तिच्या आईने हे सगळे लिखाण पुस्तकरूपात प्रकाशित करण्याबद्दल सुचवले. आता जेव्हा हे सगळे टिपण पुस्तक म्हणून प्रसिद्ध होणार असल्याचे कळल्यानंतर प्रिशाने तिची सगळी टिपणं विस्तारित स्वरूपात पुन्हा लिहून काढली. आपण आज जे लिहितो, प्रसिद्ध करतो आहोत ते काही काळानंतर संदर्भासाठी वापरले जाऊ शकते, याची जाणीव तिला झाली आणि मग महिनाभरात सगळ्या टिपणांनी सुव्यवस्थित रूप घेतले.
मानधनातून दिले हजार लोकांना अन्न
पुस्तकातून पैसे कमवावे हा उद्देश प्रिशाचा किंवा तिच्या पालकांचा कधीच नव्हता. त्यामुळे तिने ‘पॅनडॅमिक 2020’ या पुस्तकाच्या विक्रीतून किती आर्थिक फायदा होईल याकडे कधीच लक्ष दिले नाही. उलट प्रकाशकाने दिलेल्या मानधनातून प्रिशाने ‘थॅक्सगिव्हिंग’रोजी सुमारे एक हजार 50 जणांना अन्नवाटप करत आणि ‘डेअर टू केअर फुड बँक’ या तसेच कोविडकाळात गरजूंना सहकार्य करणार्या इतर सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करत आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली.
हे पुस्तक का आहे? तर कोविडसारखी जागतिक महामारी माझ्या बालपणातच अनुभवली. येणार्या काळात जेव्हा याबद्दल काही अधिक संशोधन होईल, अभ्यास होईल. तेव्हा त्यामध्ये माझ्यासारख्या बालवयातील मुलांवर या महामारीचा काय परिणाम झाला. आमची मानसिकता काय होती. आम्ही या महामारीबद्दल काय विचार करत होतो, आम्ही या काळात काय केले, या नकारात्मक वातावरणात कसे सकारात्मक राहिलो, हे सगळे जगासमोर येणे गरजेचे वाटले. म्हणून मग आई-बाबांच्या प्रोत्साहनामुळे मी माझ्या ‘नोट कार्डस्’वरील टिपणं पुस्तकरूपात प्रकाशित केली.
– प्रिशा हेडाऊ,
बाललेखिका,
’पॅनडॅमिक 2020 : अ 9 इयर्स ओल्डस् पर्स्पेक्टिव्ह’
