Rashtramat

खरा चाणक्य

sharad pawar
  • सुकृत खांडेकर

केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली एनडीएचे सरकार असताना, लोकसभेत भाजपाचे भरभक्कम बहुमत असताना आणि गेल्या वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंबर १ चा पक्ष म्हणून निवडून आलेला असताना भाजपाला सत्तेपासून दूर ठेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात सर्वाधिक मोठा वाटा हा शरद पवार यांचाच होता. पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत तसेच महाविकास आघाडीचेही सर्वोसर्वा आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार स्थापन करणे व चालवणे हे काही सोपे नाही. तीन पक्षांचा अजेंडा वेगळा, विचारधारा वेगळी आणि इतिहासही वेगवेगळा आहे. मी पुन्हा येईन, म्हणणारे देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या मदतीने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण राष्ट्रवादीच्या आमदारांची कुमक फडणवीसांच्या पाठिशी उभी राहीली नाही, जे शरद पवारांनी ठरवले होते व त्यांनी जी पटकथा लिहिली होती तीच प्रत्यक्षात साकारली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
राजकीय मुत्सद्दीपणात पवार यांचा कोणी हात धरू शकणार नाही. जे त्यांना आडवे गेले, त्यांना राजकीयदृष्ट्या संपविल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. ज्यांनी त्यांना निष्ठा वाहिल्या किंवा त्यांना साथ दिली, त्यांचे भले केल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही. गेली पंचावन्न वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हेच केंद्रस्थानी आहेत. देशाच्या राजकारणात तेवढाच त्यांचा दबदबा आहे. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करतानाही तीस पस्तीशीच्या तरूणाला लाजवेल असा दांडगा उत्साह त्यांच्यापाशी आहे. वयाची व प्रकृतीची पर्वा न करता ते पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असतात. कारण त्यांची नाळ हीच जनतेच्या सुखदुःखाशी जोडलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी शिवसेनाप्रमुखांची पुण्याई व वारसा मोठा आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीनंतरही त्यांनी पक्षाची एकजूट मजबूत ठेवली. पण प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना व कधी आमदार व मंत्री म्हणून विधिमंडळात एक दिवसही काम केलेले नसताना ते थेट राज्याचे मुख्यमंत्री झाले.
sharad pawar
ते मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार झाले असे म्हटले जात असले तरी त्यामागे पवारसाहेबांचीच कल्पकता व मुत्सद्दीपणा होता. राज्याचे मुख्यमंत्री राज्यात न फिरता मातोश्रीत बसून असतात असा आरोप भाजपाकडून सातत्याने केला जातो पण जनतेला काय हवे, जनतेच्या भावना काय आहेत हे शरद पवार स्वतः पायपीट करून जाणून घेत असतात हीच महाविकास आघाडीची जमेची बाजू आहे. जनतेची नाडी काय आहे हे ओळखण्याचे कौशल्य पवारसाहेबांकडे आहे. म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थितपणे चालू आहे. मविआचे सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार, खाते वाटप आणि पहिले बजेट अधिवेशन सुरू होईपर्यंत कोरोनाने राज्यात प्रवेश केला. गेले आठ महिने कोरोनाशी युध्द लढण्यातच या सरकारचा सर्वाधिक वेळ गेला. कोरोना संकटाची जाणीव न ठेवता भाजपने वारंवार सरकार पडणार अशा तारखा दिल्या. अंतर्गत मतभेदांमुळे सरकार कोसळेल असे भाजप नेते सतत सांगत राहीले. पण पवारसाहेबांचा भक्कम आधार असल्याने या सरकारला साधी भेगही पडली नाही. जोपर्यंत शरद पवारांचा भक्कम टेकू या सरकारला आहे तोपर्यंत सरकारला धोका नाही, हे महाराष्ट्राचे राजकीय चित्र आहे.
१९७८ मधे वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पवार यांनी जनसंघ, समाजवादी, शेकाप व डाव्या पक्षांसह राज्यात पुलोदचे सरकार स्थापन केले होते. त्यांनंतर २०१९ मधे त्यांनी भाजपाला रोखण्यासाठी मविआचे सरकार स्थानप करून दाखवले हे दुसरा मोठा चमत्कार आहे. मविआचे नेतृत्व करण्यासाठी ठाकरे यांना आणि शिवसेनेबरोबर सरकारमधे सहभागी होण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना राजी करण्यात पवारांनी मोलाची व महत्वाची भूमिका बजावली.
पुलोद स्थापन करून ते स्वतः मुख्यमंत्री झाले होते आता मविआ स्थापन करून पवारांनी प्रमुख शिल्पकारांची भूमिका बजावली आहे. तीन कृषी कायदे रद्द करा य़ा मागणीसाठी दोन आठवड्यांहून अधिक काळ मोदी सरकारला हादरा देणाऱ्या किसान आंदोलनाला शरद पवारांनी पाठिंबा देताच, भाजपाने त्यांच्यावर हल्ला बोल केला. युपीएच्या काळात पवार हे दहा वर्षे कृषीमंत्री होते. ११ ऑगस्ट २०१० मधे त्यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात सुधारणा करण्याचे सुचवले होते. या पत्राचे भांडवल भाजपाने केले. पवार खोटारडे आहेत, ते पटली मारणारे आहेत, कृषी कायद्यात सुधारणा केली नाही तर राज्यांना आर्थिक मदत बंद करू, असे पवारांनी राज्यांना धमकावले होते असे सांगण्यापर्यंत भाजपाची मजल गेली. कृषी बाजारात पायाभूत सुविधांमधे खाजगी क्षेत्राची भागीदारी असली पाहिजे, असे पवार त्यावेळी सांगत होते असा डंका भाजपने पिटला. पवारांचे ते पत्र १६५ पानी आहे, पण भाजपाने निवडक दोन पाने मिडियासमोर फडकावली. त्याच पवारांनी राहूल गांधी व अन्य नेत्यांना बरोबर घेऊन राष्ट्रपतींसमोर किसान आंदोलकांची बाजू परखडपणे मांडली.
sharad pawar
राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी पदवीधर, शिक्षक व स्थानिय स्वराज संस्था मतदारसंघातून निवडणुका झाल्या. सहापैकी नंदुरबार धुळे स्थानिक स्वराज मतदारसंघ वगळता, पुणे, नागपूर व अमरावती अशा पाच मतदारसंघात भाजपाला पराभव पत्करावा लागला, यामागेही पवारांची रणनिती होती. कोरोना काळात सरकार जनतेला समोर दिसत नव्हते. सरकारमधील मंत्री, नोकरशहा किंवा शासकीय कर्मचारी यांच्यापर्यंत पोचणे आजही महाकठीण आहे. जनता व सरकार यांच्यात दुवा म्हणून केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत होता व आहे. पवार यांच्या सुचनेवरूनच मुंबईच्या बेलार्ड पिअरमधील पक्षाच्या कार्यालयात दर आठवड्याला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता दरबार चालू आहे.
अजितदादांपासून अनिल देशमुख, छगन भुजबळ, नबाब मलिक, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरेपर्यंत सारे मंत्री तिथे जनतेला थेट भेटत असतात. महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी, पूर, कोकणातील निसर्ग वादळ अशा संकटानंतर स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता पवारसाहेब हे शेतीच्या बांधावर जाऊन किंवा चिखल तुवडत शेतात जाऊन शेतकऱ्यांना भेटले व त्यांची विचारपूर करून त्यांना दिलासा दिला, हे सर्व आश्चर्यकारक होते. शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचे मदतीचे पॅकेज देण्यातही त्यांचा सरकारला सल्ला मोलाचा होता. 
विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीची निर्मिती चालू असताना अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असा घाईघाईने मोजक्या वह्राडींच्या उपस्थितीत राजभवनात पहाटेच्या अंधारात शपथविधी झाला. ते सरकार ऐंशी तासात कोसळले. त्या काळात शरद पवारांची चाणक्यनिती यशस्वी ठरली. त्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी आमदार गेले नाहीत व कार्यकर्तेही धावले नाहीत. अपहरण झालेल्या चार आमदारांची हरयाणा- दिल्लीतून नाट्यपूर्ण सुटका करून त्यांना मुंबईत हयात वर आणले गेले. पवारांच्या चाणक्यनितीपुढे भाजपची ताकद व प्रतिष्ठा फोल ठरली. एकनाथ खडसे व जयसिंग गायकवाड हे भाजपमधील दोन मोठे राष्ट्रवादीत आले, तेही पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन. पवारांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ऐंशी हजार तरूणांना रोजगार देणारा अभिनव उपक्रम पक्षाने सरकारच्या मदतीने राबवला आहे. आरोग्यसंपन्न शतायुषी होवोत, अशा पवारसाहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा!

हे वाचलंत का?

मुंबईत साकारले देशातील पहिलेवहिले हिअरिंग केअर साउंड सेंटर

Rashtramat

‘इंडियन पॅनोरमा’वर मल्याळम सिनेमांचे वर्चस्व

Rashtramat

सचिन पायलट यांना पदांवरून काँग्रेसने हटवले

Rashtramat

Leave a Comment