नवी दिल्ली :
कोरोना विषाणू ह्या विषयावरील लघुपटांच्या निर्मितीचा सोहळा साजरा करण्यासाठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची कल्पना फारच उत्कृष्ट आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत सोमवारी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कोरोना विषाणू लघुपट महोत्सवात बोलताना जावडेकर म्हणाले की या महोत्सवात एकाच विषयावर बेतलेले आणि जगातील 108 देशांमध्ये निर्माण झालेले 2800 चित्रपट प्रदर्शित होणे, हे जगभरातील लोकांच्या अमर्याद प्रतिभाशक्तीचे उदाहरण आहे. अशा अभिनव महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल जावडेकर यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
जगात सध्या पसरलेल्या कोरोना महामारीमुळे बहुतांश देशांवर खूप खोल परिणाम झाले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महामारीचा धोका 2020 च्या अगदी सुरुवातीलाच ओळखल्यामुळे त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारत सरकारला ही आपत्कालीन परिस्थिती त्यावेळी योग्य प्रकारे हाताळता आली आणि सध्या देखील या संकटाशी लढण्यासाठी सरकार अविरतपणे काम करीत आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचे संकट आता संपण्याच्या मार्गावर आहे आणि या रोगावरची लस भारतात देखील लवकरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र लस घेतल्यानंतर रक्तात पुरेशी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) निर्माण होईपर्यंत आणि लसीचा दुसरा डोस घेईपर्यंत सर्वांनी आत्ता घेत असलेली काळजी घेणे आवश्यक आहे, आत्ता करत असलेले उपाय न करणे घातक ठरू शकेल, असा इशारा त्यांनी या निमित्ताने सर्वांना दिला.
गोव्यात आयोजित होणार असलेल्या 51व्या इफ्फी अर्थात भारतीय जागतिक चित्रपट महोत्सवाबद्दल बोलताना जावडेकर म्हणाले या वर्षी हा महोत्सव मिश्र पद्धतीने आयोजित करण्यात येईल. जनतेला या महोत्सवामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होता येईल. या महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप सोहळा मात्र नियोजित स्थळी अत्यंत मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत होईल. या वर्षीच्या इफ्फीमध्ये 21 नॉन-फीचर प्रकारातील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी दिली.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी, भारतासारख्या अफाट विस्ताराच्या देशात कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अभिनंदन केले. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणातील लघुपट एकाच ठिकाणी प्रदर्शनासाठी एकत्र आणल्याबद्दल नक्वी यांनी या महोत्सवाचे आयोजक आणि परीक्षक यांचे अभिनंदन केले.
हे वाचलंत का?
- Comments
- Facebook comments