Rashtramat

पुन्हा भाजपच!

BJP Goa

दोन्ही जिल्हा पंचायतींवर निर्विवाद वर्चस्व; एकूण ३३ जागा जिंकल्या

पणजी :
जिल्हा पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत  विरोधकांना भुईसपाट केले व  ४९ जागातील तब्बल ३३ जागा पटकावल्या आणि दोन्ही जिल्हा पंचायतीवर पूर्ण बहुमतही प्राप्त करीत विरोधी पक्षांची धुळधाण उडवली. भाजपनेपहिल्यांदाच गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींंवर बहुमत प्राप्त केले असून उत्तरेत भाजपचे २५ पैकी १९ उमेदवार निवडून आले. तर दक्षिणेत  २५ पैकी १७  जागा लढवलेल्या भाजपला १४ जागा प्राप्त झाल्या.
गोव्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींंसाठी १२ डिसेंबर रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान झाले होते. त्यानंतर आज  तालुक्याच्या ठिकाणी  मतमोजणी झाली. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होताच सकाळपासूनच निकाल जाहीर होत होते आणि भाजप विजयी होत गेला.  साखवाळ मतदारसंघा भाजपचा उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होता .तर नावेली येथील एका उमेदवाराचे निधन झाल्यामुळे तेथील निवडणूक  स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे ५० पैकी ४८ जागांसाठी निवडणूक झाली.  त्यातील ३२ जागा आणि बिनविरोध निवडून आलेली एक उमेदवार असे मिळून ३३ जागा भाजपने पटकावल्या. तर अनेक वर्षे गोव्यात सत्ता राबवलेल्या आणि सध्या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला फक्त ४  जागांवर समाधान मानावे लागले. मगो पक्षाला फोंडा तालुक्यातील ३ जागा प्राप्त झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी आपल्या मतदारसंघातील १ जागा राष्ट्रवादी काँँग्रेस निशाणीवर राखली तर बाणावलीतील १ जागा आम आदमी पक्षाने निसटत्या मताद्वारे मिळवली. अपक्षांनी ७ जागा  पटकावल्या.दक्षिण गोव्यात भाजपाला  १४, काँग्रेसला ३, मगो पक्षाला ३, राष्ट्रवादी काँग्रेसला१, आपला १ व अपक्षांना २  जागा प्राप्त झाल्या. उत्तर गोव्यात भाजपला १९,  कांग्रेसला १, मगो ०, आप ०, राष्ट्रवादी काँग्रेस ० व ५  अपक्ष निवडून आले आहेत. एकूण जागांचा विचार करता ४९ जागा पैकी ३३  जागा भाजपला  मिळाल्या आहेत. तीन जागा काँग्रेसला, तीन जागा मगोला, एक राष्ट्रवादीला, एक आपला  व इतर सात अपक्षांना असा निकाल लागला आहे. 
BJP Goa
सत्तरी तालुक्यातील चारही जागा भाजपने विक्रमी मताधिक्‍याने पटकावल्या. केरी मतदारसंघातील भाजप उमेदवार देवयानी गावस यांनी राज्यात सर्वात जास्त ४८०० मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला. त्याच बरोबर सत्तरीतील इतर उमेदवारसुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या केपे तालुक्यातील चारही जागा भाजपने पटकावल्या. पेडणे तालुक्यात काही प्रमाणात भाजपला फटका बसला . हरमल  मतदारसंघात आणि मोरजी या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले. भाजप, काँग्रेस, मगो व आप  अशा चार पक्षांच्या लढतीमध्ये अपक्षांना लाभ होऊन सात ठिकाणी अपक्ष निवडून आले. या अपक्षात थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या पत्नी कविता कांदोळकर या कोलवाळमधून निवडून आल्या. याच मतदारसंघातील शिरसई जिल्हा पंचायत मतदारसंघात विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य भाजपच्या दीक्षा कानोळकर या पुन्हा भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र सिद्धेश नाईक हे  कुंभारजुवे  विधानसभा क्षेत्रातील खोर्ली या जि. पं मतदारसंघातून निवडून आले आहेत.
काँग्रेस पक्षाने जि. पं निवडणूक विधानसभेची  सेमीफायनल असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. तसेच  दक्षिण गोव्यातील विशेषत: सालसेत  तालुक्यात कोळसा, रेल्वेचे दुपदरीकरण व मोले येथील वीज प्रकल्प याच्या विरुद्ध आंदोलन चालवण्यात येत होते. त्याचबरोबर सत्तरीतील मेळावली येथे आय आय टी विरोधात आंदोलन सुरू होते. त्यालाही विरोधकांनी फूस लावली होती. मात्र राज्यातील एकाही आंदोलनाचा लाभ विरोधकांना  झाला नाही किंवा या आंदोलनाचा फटका सत्ताधारी पक्षाला बसला नाही. गोव्यातील मतदारांनी सत्ताधारी पक्षावर पूर्ण विश्वास व्यक्त करत तब्बल  ३३ जागा प्रदान केल्या आहेत. त्यामुळे हे भाजपचे अभूतपूर्व यशच म्हणावे लागेल. काँग्रेस पक्षासाठी ही मोठी चिंतेची बाब असून संपूर्ण राज्यात फक्त ४९ पैकी ४ जागा मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व व संघटनेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्लीतील हवा गोव्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न केलेला आम आदमी पक्षालाही गोव्यातील मतदारांनी जोरदार तडाखा दिला. आपचा फक्त एक उमेदवार निवडून आला. तर  १२ जागा निवडून आणण्याची घोषणा केलेल्या मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनाही मतदारांनी  धक्का दिला आहे. एकूणच राज्यातील मतदारांनी सत्ताधारी भाजप पक्षावर पूर्ण विश्‍वास व्यक्त केला असून विरोधकांच्या अफवांना बळी न पडता भाजपाला विक्रमी यश प्राप्त करून दिलेले आहे.

हे वाचलंत का?

कोंकणी भाशा मंडळाचे पुरस्कार जाहीर

Rashtramat

२१ रोजी होणार ‘शांतीचा उत्सव’

Rashtramat

#corona: माजी सैनिकांची वाहतूक सेवा

Rashtramat

Leave a Comment