Rashtramat

‘सकारात्मकता पेरणार्‍या ‘इंद्रधोणू’ कविता’

उदय म्हांबरो यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पणजी :
उदय म्हांबरो यांच्या कविता या जगण्याकडे अत्यंत सकारात्मकतेने बघणार्‍या आहे. त्यांच्या कवितेला मानवी चेहरा आणि मन असून राग, लोभ, उद्वेग, हळवेपणा, उपहास अशा सर्व शक्यतांनी ही कविता आपल्याला पानोपानी भेटत जाते. जगण्याचे विविध पैलू आपल्यासमोर मांडत जाते. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डोकं वर काढून जगण्याची नवी तीव्र आस ती दाखवते, अशा शब्दांत कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांनी प्रसिध्द कोकणी कवी उदय म्हांबरो यांच्या ’इंद्रधोणू उदेव!’ काव्यसंग्रहाचे वैशिष्ट विशद केले. विश्व कोंकणी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष बस्ती वामन शणै यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर पुस्तकावर डॉ. जोशी बोलत होत्या.
विन्सन फिल्म अ‍ॅण्ड मिडिया अकादमी आणि बिम्ब प्रकाशनच्या संयुक्तविद्यमाने युट्यूबवर आयोजित या विशेष ऑनलाईन प्रकाशनसोहळ्याला बस्ती वामन शणै आणि डॉ. अनुजा जोशी यांच्यासोबत प्रकाशक दिलीप बोरकर, कवी उदय म्हांबरो, जेष्ठ पत्रकार आणि कवी संजीव वेरेकर यांचीदेखील उपस्थिती होती.
कवीच्या रोजच्या जगण्यात आलेल्या अनुभवांचं एक वेगळं चिंतन या कवितेत येतं. परकायाप्रवेश केल्याप्रमाणे यात कवीने बदललेल्या रुपांमुळे विचारांचा एक वेगळाच पैलू या संग्रहातून हाती येतो, असे यावेळी डॉ. अनुजा जोशी यांनी सांगत, गोव्याचा ताजा टवटवीत निसर्ग ‘इंद्रधोणू’मध्ये अभावितपणे उतरल्याचेही नमूद केले.

या संग्रहातील कविता ही निसर्गाविषयी, मानवी वृत्ती-प्रवृत्तीविषयी आणि वातावरणबदलाविषयी महत्वाचे विधान करणारी आहे. बर्‍याच ठिकाणी थेट आणि कित्येक ठिकाणी विविध रुपं आणि रुपकं घेऊन आपले म्हणणे पोहोचवणार्‍या या कवितांमुळे कोकणी साहित्यामध्ये मोलाची भर पडली असल्याचे प्रतिपादन विश्व कोकणी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष बस्ती वामन शणै यांनी यावेळी सांगितले.
सध्याच्या सगळ्या अनारोग्यी नकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ‘इंद्रधोणू उदेव!’मधील कवितांमुळे सकारात्मकता वाढावी आणि येणार्‍या काळात प्रत्येकाची उमेद वाढावी अशी अपेक्षा यावेळी कवी उदय म्हांबरो यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप बोरकर यांनी केले तर, कवी संजीव वेरेंकर यांनीही पुस्तक आणि कवीला सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन आरती कामत यांनी केले. 


हा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी इथे  क्लीक करा. 

हे वाचलंत का?

‘म्हाका नाका गे’वर गोलमेज चर्चा

Rashtramat

‘एन एक्स्ट्राऑर्डनरी लाइफ’ला ‘एक्स्ट्राऑर्डनरी’ प्रतिसाद

Rashtramat

‘आम्ही घेतोय केरळचे मार्गदर्शन’

Rashtramat

Leave a Comment