Rashtramat

‘असा’ होऊ शकतो फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार

lung cancer
  • डॉ. सलील पाटकर

फुफ्फुसाचा कर्करोग हा जगात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. इतर अनेक कर्करोगांच्या तुलनेत, या कर्करोगामध्ये मृत्यूदर सर्वात जास्त असल्याचे आढळून आले आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एकदा निदान झाल्यावर, या रोगाचा किती प्रसार झाला हे शोधणे महत्वाचे असते. यासाठी, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या अवस्थेचे मूल्यांकन केले जाते आणि हा रोग कोणत्या टप्प्यात आहे, हे लक्षात आल्यावर त्या आधारे उपचारपद्धतीचे नियोजन करण्यात येते. कर्करोगाचा प्रकार, ट्यूमरचा आकार, तो किती प्रमाणात पसरला आणि रुग्णाची स्थिती यावर हे उपचार अवलंबून असतात.
सूक्ष्मदर्शकावर ट्युमरच्या पेशी कोणत्या स्वरुपात दिसतात, त्याआधारे फुफ्फुसाच्या कर्करोगाची दोन प्रकारे विभागणी करण्यात येते ‘स्मॉल सेल’ आणि ‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुसांचा कर्करोग. हे दोन्ही कर्करोगाचे प्रकार वेगवेगळ्या उपचार पद्धतींमुळे वेगवेगळ्या मार्गांनी शरीरात पसरतात. आता आधुनिक संशोधनात त्यांचे अनेक उप-प्रकार दिसून आले आहेत. त्या प्रत्येकामध्ये नवीन रुपातील जनुके व विकृत स्वरुपातील प्रथिने आढळतात. या प्रत्येक उप-प्रकारांवर नवीन लक्ष्यित उपचारांचा वापर केला जाऊ शकतो.
‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुसाच्या कर्करोगाचे टप्पे ? – ‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुस कर्करोगाचे चार मुख्य टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात कर्करोग फुफ्फुसात आढळतो, परंतु तो फुफ्फुसांच्या बाहेर पसरत नाही. कर्करोग फुफ्फुसात व जवळच्या नोड्समध्ये आढळतो, तेव्हा त्यास दुसऱा टप्पा असे म्हटले जाते आणि जेव्हा कर्करोग छातीच्या मध्यभागी फुफ्फुसात आणि ‘लिम्फ नोड्स’मध्ये असतो, तेव्हा त्याला तिसरा टप्पा म्हणतात. शेवटच्या, म्हणजे चौथ्या टप्प्यात कर्करोग दोन्ही फुफ्फुसांमध्ये, फुफ्फुसांच्या आसपासच्या भागात किंवा दूरच्या अवयवांमध्ये पसरतो.
‘स्मॉल सेल’ फुफ्फुसाच्या कर्करोगाचे टप्पे ? – ‘स्मॉल सेल’ फुफ्फुसांच्या कर्करोगाचे दोन प्रमुख टप्पे आहेत. कर्करोग फक्त एका फुफ्फुसात किंवा त्याच बाजुच्या जवळच्या ‘लिम्फ नोड्स’मध्ये मर्यादीत प्रमाणात आढळतो; तर विस्तृत टप्प्यात, कर्करोगाचा प्रसार हा एका फुफ्फुसात संपूर्णपणे, तसेच उलट बाजूच्या फुफ्फुसात, उलट बाजूच्या ‘लिम्फ नोड्स’पर्यंत, फुफ्फुस द्रवापर्यंत आणि दूरच्या अवयवांमध्ये व ‘बोन मॅरो’मध्ये होतो.
कर्करोगाचे निदान ? – कर्करोगाचे निश्चित निदान हे तो कोणत्या टप्प्यात आहे, यावर अवलंबून असते. तो सुरुवातीच्या टप्प्यात एकाच ठिकाणी असतो व इतरत्र पसरलेला नसतो, तेव्हाची परिस्थिती बरी म्हणता येईल. अशा वेळी, विशेषत: उच्च जोखीम असलेल्या व लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तींच्या नियमित चाचण्या करणे आवश्यक असते.
‘कमी-डोस सीटी स्कॅन’ चाचणीमुळे फुफ्फुसातील तांदळाच्या दाण्याइतकी बारीक असलेली कोणतीही विकृती दिसून येते. यामुळे पहिल्या टप्प्यात असलेला व शरिराच्या इतर भागात पसरण्याची कमी शक्यता असलेला, बरा होऊ शकणारा कर्करोग शोधून काढण्यात मदत होते. डॉक्टरांना रुग्णावर उपचार करण्याचे अनेक पर्याय अशावेळी उपलब्ध असतात आणि रुग्ण वाचण्याची शक्यताही बरीच मोठी असते.
पहिल्या टप्प्यात असलेला ‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुसाचा कर्करोग आढळल्यास, शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार करावा लागतो. त्यामध्ये फुफ्फुस आणि ‘लिम्फ नोड्स’चा प्रभावित झालेला भाग काढून टाकण्यात येतो. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात असलेल्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी हे उपचार एकत्रपणे करण्याची आवश्यकता निर्माण होते. तसेच शस्त्रक्रियेतही फुफ्फुसाचा कर्करोगग्रस्त भाग किंवा संपूर्ण फुफ्फुस व रोगग्रस्त लिम्फ नोड्स हे भाग काढून टाकावे लागतात. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील कर्करोगासाठी अन्य उपचार करणे अतिशय अवघड असते, तेथे इम्युनोथेरपी व लक्ष्यित उपचारपद्धती यांचा वापर करण्यात येतो.
केंद्रित उपचारपद्धतीं – केंद्रित उपचारपद्धतींत कर्करोगाच्या पेशींना ‘लक्ष्य’ बनवून त्यांच्यावरच नेमकेपणाने, अचूकपणे औषधे व इतर पदार्थांचा वापर करून उपचार करण्यात येतात. यामध्ये सभोवतालच्या सामान्य पेशींना हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात येते. ही केंद्रित उपचारपद्धती ‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुस कर्करोगावर अधिक परिणामकारक असते. कर्करोगाच्या पेशीमधील विशिष्ट भाग यामध्ये लक्ष्य करण्यात येतो. कोणत्याही रुग्णामधील विशिष्ट प्रकारच्या कर्करोगावरील उपचारपद्धतीशी हे केंद्रित उपचार जुळून येतात, त्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगासारख्या काही विशिष्ट कर्करोगांवर ही लक्ष्यित उपचारपद्धती फार प्रभावी ठरते. तसेच, इतर प्रमाणित उपचारांच्या तुलनेत या केंद्रित उपचारपद्धतींचे दुष्परिणाम कमी असतात.
lung cancer
‘मोनोक्लोनल अँटीबॉडीज’, ज्यास ‘एम-ऑब्ज’ म्हणतात, आणि ‘स्मॉल मॉलिक्यूल ड्रग्ज’, असे केंद्रित उपचारपद्धतींचे दोन प्रकार असतात. ‘एम-ऑब्ज’मध्ये कर्करोगाच्या थेट पेशींवर किंवा त्यांच्या आसपासच्या भागाला लक्ष्य केले जाते व या पेशींची वाढ रोखली जाते. केमोथेरपीसारख्या प्रमाणित उपचारांबरोबर ‘एम-ऑब्ज’ चे उपचार केल्यास, कर्करोगाच्या पेशींपर्यंत औषध चांगल्या प्रकारे पोहोचते. ‘एम-ऑब्ज’ची औषधे सहसा रक्तवाहिनीतून, म्हणजे रक्तप्रवाहात दिली जातात. ‘स्मॉल मॉलिक्यूल’ औषधे सामान्यत: तोंडी घेतली जातात आणि कर्करोगाच्या पेशींची वाढ व प्रसार रोखण्याचे कार्य ती करतात.
केंद्रित उपचारपद्धती यशस्वी होण्याकरीता, रुग्णाच्या ट्यूमरच्या उतीची चाचणी करून ठरविलेले लक्ष्य योग्य आहे किंवा कसे, हे निश्चित केले जाते. ज्या जनुकांमुळे लक्ष्य निश्चित केले जाते, अशांमध्ये ट्यूमर पेशींनी विशिष्ट रूपांतर केले, तर त्या रुग्णांसाठी केंद्रित उपचारपद्धती सर्वात फायदेशीर ठरते. ट्यूमर पेशींचे रुपांतर जनुकांमध्ये होत नसलेल्या रूग्णांना या बाबतीत निवडले जात नाही, कारण औषधाने लक्ष्य करावे, असे त्यांच्यामध्ये काहीच नसते. एखाद्या रुग्णाने इतर उपचारांना प्रतिसाद दिला नाही किंवा त्याच्यावर शस्त्रक्रियाही करता येत नसेल, तर त्याला केंद्रित उपचारपद्धतींची मदत होऊ शकते. केंद्रित उपचारपद्धतींमुळे फुफ्फुसांचा कर्करोग असलेल्या रूग्णांमध्ये नव्या आशा निर्माण होते.
फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी इम्युनोथेरपी:- २०१५ मध्ये ‘यू.एस.एफडीए’ने फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारांचा एक भाग म्हणून इम्युनोथेरपीला प्रथम मान्यता दिली. एखाद्या रुग्णाचा कर्करोग दूर करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी, त्याच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक प्रणालीस मदत करणारा, इम्युनोथेरपी हा उपचारांचा एक विशेष प्रकार आहे. केवळ इम्युनोथेरपी वापरल्याने किंवा ती इतर उपचारांच्या बरोबर लागू केल्याने, रुग्णांमध्ये चांगली सुधारणा घडून आल्याचे काही क्लिनिकल अभ्यासांमध्ये नुकतेच दिसून आले आहे. त्यामुळेच फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या आणखी रुग्णांवर इम्युनोथेरपीचे इतर अनेक पर्याय वापरण्यास ‘एफडीए’ने मान्यता दिली आहे. इतकेच नव्हे, तर रुग्णांवर पारंपरीक उपचारांऐवजी इम्युनोथेरपी ही प्रथमस्थानी वापरण्यासही ‘एफडीए’ने मंजुरी दिली आहे.


(लेखक नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये मेडिकल ऑन्कोलॉजीचे सल्लागार आहेत.)

हे वाचलंत का?

एका कुटुंबनियोजनाची पन्नाशी

Rashtramat

कशी केली कोरोनाकाळातील कुपोषणावर मात?

Rashtramat

मानसिकता बदलणे ही काळाची गरज

Rashtramat

Leave a Comment