मुंबई :
विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या ‘खिसा’ या मराठी लघुपटाची ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फि)मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात अधिकृत निवड झाली आहे. हा महोत्सव १६ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान गोव्यात होणार आहे. पी.पी. सिने प्रॉडक्शन, मुंबई आणि लालटिप्पा निर्मित या लघुपटाचे दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केले आहे. तर लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. चित्रीकरण विदर्भातील अकोला येथे झाले आहे.
इस्तंबूल फिल्म अवॉर्ड्स २०२० मध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार मिळाले. तर १० व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातही ‘खिसा’ने सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. तुर्कस्थानातील इस्तंबूल येथे मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या आयएफएच्या वार्षिक लाइव्ह स्क्रीनिंग मेळाव्यात प्रतिष्ठित अशा गोल्डन स्टार पुरस्कारासाठी हा लघुपट पात्र ठरला असून डब्लिन इंटरनॅशनल शॉर्ट अँड म्युझिक फेस्टिव्हल २०२० मध्ये ‘खिसा’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकन मिळाले आहे. मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही ‘खिसा’ ने सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताच्या पुरस्कार मिळवला आहे.
ललित कला अकादमीतर्फे ५४ वा राष्ट्रीय अकादमी पुरस्कार पटकावणारे राज प्रीतम मोरे आपल्या ‘खिसा’ या पहिल्या लघुपटाबद्दल सांगतात, ”खिसा ही कथा देशाच्या सामाजिक वातावरणावर आणि खेडेगावातील आजही संकुचित असलेल्या दृष्टिकोनावर भाष्य करणारी आहे. महाराष्ट्रातील एका लहान गावात इतर मुलांच्या खिशापेक्षा मोठा खिसा शिवून घेणाऱ्या मुलाची खिशात न मावणारी कथा म्हणजे ‘खिसा’ मन हेलावून टाकणारी ही कथा आहे.”
या लघुपटात कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या भूमिका असून याला पारिजात चक्रवर्ती यांचे संगीत लाभले आहे. संकलनाची धुरा संतोष मैथानी यांनी सांभाळली असून सिमरजितसिंह सुमन यांनी छायाचित्रण केले आहे.
हे वाचलंत का?
- Comments
- Facebook comments