पुणे :
भारत सरकारच्या रिजिनल आऊटरीच ब्यूरो (आरओबी) अर्थात प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे यांनी टाळेबंदीच्या काळात डिजिटल माध्यमाचा वापर करून अनेक जनजागृती कार्यक्रम घेतले. त्यातील एक म्हणजे नव्याने सुरू झालेली पॉडकास्ट मालिका ‘कळलं का महाराजा?!’. या पॉडकास्टचे शिर्षक ‘लोकजागर’ असे आहे.
या मालिकेतील नवा म्हणजे अकरावा भाग कोरोना लशीविषयी जनजागृती करणारा आहे. आपल्या देशाने आत्मनिर्भरपणे एका मोठ्या यशाला गवसणी घातली आहे, यासाठी यामागे कष्ट घेतलेल्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी आणि या लशीविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा भाग सर्वसामान्यांनी नक्की ऐकावा असा आहे.
जळगाव मधील दिशा समाजप्रबोधन संस्थेतील कलाकारांनी या भागामध्ये आपले योगदान दिले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महानिदेशक, मनीष देसाई यांच्या संकल्पेनेतून तयार झालेली ही मालिका सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे, शंकांचे निराकरण करणारी आहे.
दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना जीवंत ठेवणे, तरुणांमध्ये लोककलांचा प्रसार करणे आणि नागरिकांना जागरूक करणे, अशा तीन गोष्टी यातून साध्य होत आहेत, अशी भावना निदेशक संतोष अजमेरा यांनी व्यक्त केली आहे.
आत्मनिर्भर भारत, ई- संजीवनी, शेती कायदे, कोरोना काळात घ्यायची काळजी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा विविध सरकारी योजनांची आणि जागरूकते विषयीची माहिती हसत-खेळत, नाटकीय रुपात या पॉडकास्ट मधून सादर केली जाते.
ही संपूर्ण मालिका आणि नवा भाग ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
हे वाचलंत का?
- Comments
- Facebook comments