Rashtramat

इफ्फीमध्ये कोकणीचा ‘शिंवर’

पणजी, किशोर अर्जुन:

पावसाचे आणि आपले नाते हे वेगळेच असते आणि जेव्हा हा पाऊस गोव्यातला असतो तेव्हा तर विचारता सोय नाही. पण असे असले तरी पाऊस या विषयावर आपल्याकडे म्हणावी तशी सिनेनिर्मिती झाली नाही. त्यामुळे पावसाची गोष्ट घेऊन ‘शिंवर’ करावे असे ठरवले आणि आज याठिकाणी इफ्फीच्या माध्यमातून ‘शिंवर’ जगासमोर येत आहे याचा विशेष आनंद होत आहे, अशा शब्दात ‘शिंवर’ या कोंकणी लघुपटाचा लेखक आणि दिग्दर्शक मांगिरीश बांदोडकर सांगतो. ’इफ्फी’मधील गोवन स्टोरीज्-प्रीमियर विभागात ‘शिंवर’ आज दाखवण्यात आला त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एकच पाऊस एकाच घरातल्या तीन पिढ्यांना कसा वेगळा दिसतो याचे अत्यंत नेमके आणि भावस्पर्शी चित्रीकरण ’शिंवर’च्या माध्यमातून करण्यात आले आहे. या लघुपट याबद्दल मांगिरीशसोबत संवाद साधला असता त्याने सांगितले; ’दोन-तीन वर्षांपूर्वी एक मल्याळम सिनेमा पाहिला होता. त्यामध्ये पावसाचा खूपच सुरेख वापर करण्यात आला होता. गोवासुध्दा कोकण किनारपट्टीवर आणि प्रचंड पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. असे असतानादेखील आपणाकडे मात्र पावसाकडे सिनेकथापात्र म्हणून पाहिलेले दिसत नाही. यापार्श्वभूमीवर कोंकणीतील जेष्ठ लेखक दामोदर मावझो यांची एक कथा माझ्या वाचण्यात आली. मी ती मित्रपरिवाराला ऐकवली. त्यांना ती आवडली आणि त्यानंतर आम्ही मग सगळी जुळवाजुळव करून लघुपटाची प्रत्यक्ष निर्मिती केली.’

वास्तविक हा लघुपट 2019 च्या इफ्फी- एनएफडीसी फिल्म बाजारमध्ये निवडला गेला होता. त्या ठिकाणी त्याचे विशेष प्रदर्शनदेखील करण्यात आले. त्यावेळी ‘शिंंवर’ला निर्मिती पश्चात्यच्या बाबींसाठी आर्थिक गरज होती. त्याचप्रमाणे ’ओटीटी’च्या माध्यमातून हा लघुपट विकला किंवा प्रदर्शित केला जावा यासाठीही मांगिरीश आणि त्याची टीम प्रयत्नशील होते. पण कोरोनामुळे पुढे काही बाबी अडकल्या. त्यानंतर इफ्फी2020 साठी त्यांनी गोवन स्टोरीज् विभागासाठी ‘शिंवर’ची प्रवेशिका पाठवली आणि हा लघुपट प्रिमिअर विभागात अग्रक्रमाने निवडला गेला. एवढेच नाही. कोंकणीमधून या विभागात निवडला गेलेली ही एकमेव प्रवेशिका होती. यामुळेही मांगिरीश आणि सगळ्या टीमला विशेष आनंद झालेला दिसला.
आम्ही या लघुपटात मुलगा-बाबा-आजोबा या तीन पिढ्यांना जोडणार्‍या पावसाला टिपण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ’इफ्फी’च्या माध्यमातून आम्हासगळ्यांची मेहनत मोठ्या पडद्यावर आणि मोठ्या मंचाच्या माध्यमातून जगासमोर येणार ही बाब सगळ्यात आनंददायी होती. आमची इतक्या दिवसांची मेहनत फळाला आली. या निवडीमुळे आणि आज मिळालेल्या एकूण प्रतिसादामुळे आमचा उत्साह द्विगुणीत झाल्याचेही मांगिरीश नमूद करतो.

शिंवर
निर्मिती : प्रविण पारकर (फिश करी राईस प्रॉडक्शन)
दिग्दर्शक, छायाचित्रण, संकलन : मांगिरीश बांदोडकर
लेखक : दामोदर मावजो
कलाकार : आशिष नागवेकर, अनिल रायकर, आदित्य कामत, पृती सावर्डेकर, अमेय रेवणकर, आरती गावडे, सोनल कामत, इशा कामत, संजय.

हे वाचलंत का?

‘या’ देशात होणार ‘आयपीएल २०२०’

Rashtramat

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

Rashtramat

विनायक खेडेकर यांना पद्मश्री सन्मान 

Rashtramat

Leave a Comment