मुंबई :
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला युपीएल. लि. या शाश्वत शेती उत्पादने व सेवा पुरवठादार कंपनीचे संस्थापक रजनीकांत देवीदासभाई श्रॉफ यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान – पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावर्षी राष्ट्रपतींनी 119 पद्म पुरस्कार जाहीर केले आणि पद्म भूषण पुरस्कार मिळवणारे श्रॉफ हे एकमेव उद्योजक आहेत.
मूळचे वैज्ञानिक आणि नंतर उद्योजक झालेले तसेच समान संधी तत्वाचे पुरस्कर्ते असलेले युपीएल लि.चे सीएमडी श्रॉफ म्हणाले, ‘मी मनाने सच्चा देशप्रेमी आहे आणि या महान देशाच्या विकासासाठी, विशेषतः देशाचा कणा असलेल्या शेती क्षेत्रासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने मी भारावून गेलो आहे आणि त्यामुळे युपीएल. लि. समूहामधे आनंद व अभिमानाचे वातावरण आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘मी गेल्या 50 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे आणि हा माझ्यासाठी अतिशय अविस्मरणीय अनुभव आहे. इतक्या वर्षांत कंपनीने केलेली कामगिरी, माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, प्रत्येक महत्त्वाचा टप्पा हा युपीएल लि. च्या 14,000 कर्मचाऱ्यांच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे. हा सन्मान मला प्रदान केल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो व इतर पुरस्कारार्थींचे अभिनंदन करतो आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानतो.’
गेल्या 50 वर्षांच्या व्यावसायिक जीवनात श्रॉफ यांना शेती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी बरेच मान- सन्मान मिळाले आहेत. या क्षेत्राप्रती त्यांची निष्ठा, सामाजिक कामांना मिळणारा त्यांचा अखंड पाठिंबा आणि कित्येक पुरस्कार त्यांच्या क्षमतेची साक्ष देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 1969 मधे वापी (गुजरात) येथील युपीएल लि. या रेड फॉस्फरसचे उत्पादन करणाऱ्या, गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रियेचा समावेश असलेल्या आणि केवळ 4 लाख रुपयांचे बीज भांडवल असलेल्या एका लहानशा रासायनिक कंपनीचे आज भारताच्या एकमेव बहुराष्ट्रीय आणि बहुसांस्कृतिक शेती- रसायन कंपनीत रुपांतर झाले आहे. आज या कंपनीचे 14,000 कर्मचारी जगभरात पसरले असून उलाढाल 5 कोटी डॉलर्स आहे.
भारतात शेती-रसायन क्षेत्राचे औद्योगिकरण विस्तारावे, भारतीय शेतकऱ्यांसाठी दर्जेदार उत्पादने तयार करून परकीय चलनाची बचत व्हावी यासाठी श्रॉफ अविरतपणे काम करत आहेत. जर उत्पादने लहान शेतकऱ्यांना परवडणारी असतील, तरच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हेतू सफल होतो यावर त्यांचा विश्वास आहे.
समाजाचे देणे आपण दिले पाहिजे याबाबत श्रॉफ आग्रही असून ते बऱ्याच मानव कल्याण संस्था व ट्रस्ट्सचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली युपीएल लि. ने सामाजिकदृष्ट्या फायदेशीर उपक्रम राबवत इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सची निर्मिती करणे, परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत अर्थाजन उपक्रम उपलब्ध करणे तसेच त्यांच्या प्रक्रियेत निसर्ग संवर्धन पद्धतींचा समावेश करणे असे उपक्रम राबवले आहेत.
हे वाचलंत का?
- Comments
- Facebook comments