गोवा 

‘कोरोनासाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यात राज्य आघाडीवर’

पणजी :
राज्यातील कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. तसेच मृत्यूचेही प्रमाण खाली येत आहे. कोरोनाचा हा आलेख पाहून राज्यातील कॉंग्रेस पक्ष निराश झाला आहे. यामुळेच कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी भाजपवर कमरेखालची भाषा वापरून टीका केली आहे. पणजीकरांच्या या टीकेला जनताच उत्तर देईल, असे प्रतिउत्तर भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी दिले आहे.

कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपच्या नेत्यांनी आता स्मशानभूमीत त्यांची छायाचित्रे लावावीत आणि कोरोनाने मृत्यू होणार्‍या दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रावरही आपली छायाचित्रे छापावित, अशी टीका पणजीकर यांनी केली होती. याला भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी जोरदार उत्तर दिले आहे. मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यांचे कार्य संपूर्ण गोमंतकीयांना माहीत आहे. कोरोना रोखण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यात राज्य आघाडीवर असल्याचा दावा मुल्ला यांनी केला आहे.

व्यवसायाने शिक्षक असल्याचा दावा करणारे पणजीकर यांनी अशी विधाने करण्यापूर्वी विचार करावा. लोकांमध्ये नैराश्य पसरवण्याचे काम करू नये. राज्यात भाजपचे कार्य उत्तमपणे सुरू असल्याने प्रदेश कॉंग्रेसचे नेते खालच्या स्तरापर्यंत गेले आहेत. जिल्हा पंचायत, पालिका आणि इतर निवडणुकांत अपयश हाती आल्याने कॉंग्रेसचे नेते निराशवादी झाले आहेत. लोकांनी त्यांची निराशा समजून घ्यावी, अशा शब्दात मुल्ला यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून कोरोनाची तिसरी लाट आली तर राज्य सरकार तोंड देण्यास सर्वोतोपरी तयार आहे. राज्यातील सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले असून लसीकरणाची संख्या वाढावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. भाजपचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कामी मदत करत असून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होत आहे. यामुळेच कॉंगेसच्या नेत्यांमध्ये पोटशुळ उठला असावा, असे मुल्ला यांनी पत्रकात म्हटले आहे. कॉंग्रेसने सरकारवर टीका करण्याऐवजी सर्वसामान्य गोमंतकीयांपर्यंत लस पोहोचावी यासाठी प्रयत्न करावेत. आपणही काही करायचे नाही आणि दुसरे करतात तेही बघवत नाही, हे धोरण कॉंग्रेसने सोडून द्यावे, असे आवाहन उर्फान मुल्ला यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: