गोवा 

‘गोवा विकणार मोदींच्या क्रोनी क्लबला’

'कलंगुट'च्या शहरीकरणावरून काँग्रेसची भाजपवर टीका 

पणजी :
गोव्यातील भाजप सरकार या सुंदर भूमीला पंतप्रधान मोदींच्या क्रोनी क्लबला विकण्यासाठी  डाव आखत आहे. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटला शहरी दर्जा देण्याची केलेली घोषणा म्हणजे त्या दृष्टीने  उचललेले पाऊल आहे असा गंभीर आरोप माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा हजर होते.

कळंगुटला शहरी दर्जा जाहिर करण्यापुर्वी सरकारने कळंगुटवासीयांना विश्वासात घेतलेले नाही. आमच्या सुंदर गावाची अस्मिता नष्ट करणारा शहरी दर्जा स्थानिकांना मान्य नसल्याचे आग्नेलो फर्नांडिस यांनी सांगितले.

सरकारने अधिसुचीत केल्याप्रमाणे शहरी दर्जा मिळाल्यानंतर किनारी व्यवस्थापन आराखड्याखाली सध्या अस्तित्वात असलेली २०० मीटर बांधकामाची अट शिथील होवुन ५० मीटर होणार आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर भल्या मोठ्या इमारती उभ्या राहतील. मोदींच्या क्रोनी क्लबला हॉटेल्स व इतर प्रकल्प उभारण्यास मोकळीक देण्यासाठीच भाजपने हे षडयंत्र रचले असुन, सदर प्रकल्प आल्यानंतर स्थानिक शॅक व्यावसायीक तसेच जल क्रिडा व्यावसायीकांना जगणे मुश्कील होणार आहे असे आग्नेलो फर्नांडिस म्हणाले.

कॉंग्रेस पक्षाने केलेल्या प्रखर विरोधानंतर सरकाने ५६ गावांना शहरी दर्जा देण्याची ३० जानेवारी २०२० रोजी जारी केलेली अधिसुचना १८ फेब्रुवारी रोजी रद्द केली होती याची आठवण आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा यांनी करुन दिली. फेब्रुवारी २०२० ते २७ मे २०२१ च्या दरम्यान असे काय घडले जेणेकरुन भाजप सरकारला केवळ कळंगुटला शहरी दर्जा देण्याची गरज भासली असा प्रश्न तुलीयो डिसोजा यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित २७ मे २०२१ रोजी कळंगुटला शहरी दर्जा देणारी अधिसुचना रद्द करावी. भाजप सरकारने कारवाई न केल्यास कॉंग्रेस पक्ष स्थानीक लोकांना बरोबर घेवुन प्रखर आंदोलन करणार असल्याचा इशारा तुलीयो डिसोजा यांनी दिला आहे. कॉंग्रेस पक्ष लोकांचा आवाज बनुन गोमंतकाची अस्मिता सांभाळण्यासाठी नेहमीच तत्पर असेल.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: