गोवा 

‘राज्य सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच’ 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा गंभीर आरोप 

पणजी :
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात ‘इंटेसिव्हीस्ट’ नसल्याची धक्कादायक  माहिती डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी उघड केल्याने, गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने शेकडो निष्पाप रुग्णांचे बळी गेल्या नंतरही लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे असा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा बंद करुन कोविड रुग्णांचे बळी घेणाऱ्या भाजप सरकारने मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मध्ये कमिशनच्या वाटणीवरुन नवा वाद तयार झाल्याने अजुनही गोमेकॉतील ऑक्सिजन प्रकल्प कार्यांवित केलेला नाही. सदर प्लांटसाठी लागणारा कोंप्रेसर विकत घेताना सदर पुरवठादाराकडुन किक-बॅक च्या रकमेची वाटणी करण्यात मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांमध्ये एकवाक्यता होत नसल्याने सदर कोंप्रेसर अजुनही गोमेकॉत पोचलेला नाही असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यानी २५ एप्रिल रोजी सदर ऑक्सिजन प्रकल्प १५ मे २०२१ पर्यंत कार्यांवित करणार असल्याचे जाहिर केले होते. भाजप सरकारच्या मंत्र्यांमधील भ्रष्टाचाराने आज शासन काळवंडलेले आहे. भाजपचे पदाधिकारीही मलीदा लाटण्यात व्यस्त असुन, आजाराचा बाजार करुन लुटमार करीत आहेत. भाजप सरकारच्या गैर प्राथमिकतांमुळे आज शेकडो लोकांचे बळी गेले आहेत असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला.

कोविड महामारीचे संकट समोर असताना, तसेच तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असताना, भाजप सरकार अतिदक्षता विभागाची देखरेख ठेवण्यासाठी सदर डॉक्टरचा पगार परवडत नाही म्हणुन “इंटेसिव्हीस्ट” ची नेमणुक करीत नाही. भाजप सरकारकडे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांचे स्मृतीस्थळ  बांधण्यासाठी १० ते १५ कोटी आहेत, परंतु लोकांच्या आरोग्यासाठी एक इंटेसिव्हीस्ट नेमणे सरकारला परवडत नाही यावरुन या सरकारचा बेजबाबदारपणा दिसतो. गोमेकॉत तसेच इतर सरकारी इस्पितळात आज डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. परंतु, प्रत्येक सरकारी नोकरी विकणारे भाजप सरकार लाच मिळत नसल्यानेच सदर पदांवर योग्य तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करीत नाही.

कोविड आजारावर खबरदारीचा उपाय म्हणुन आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर, होम आयजोलेशन किट मधील नादुरूस्त ऑक्सिमीटर व कमी औषधे यावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे गप्प आहेत. कॉंग्रेस पक्षाने यात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचे उघड केल्यानेच आरोग्यमंत्री काहीच बोलत नाहीत, असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

गोमेकॉतील ऑक्सिजन पुरवठा व दगावलेले रुग्ण यांची चौकशी करण्यासाठी सरकारने तिन सदस्यिय समिती नेमली होती. सदर समितीचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिम्मत असेल तर जाहिर करावा असे उघड आव्हान गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.

सरकारने लोकांच्या जीवाशी व भावनांशी खेळणे बंद करावे. आता केवळ आरोग्य सुविधा भक्कम करण्यावर सरकारने खर्च करावा व इतर सर्व वायफळ खर्च बंद करावेत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: