गोवा 

‘सरकारने ‘या’ मार्गाने लुटले २२ लाख ७० हजार कोटी’

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची टीका

पणजी :

जे पेट्रोल ३५.६३ रुपयांना मिळते ते तब्बल ९३.८० रुपयांना आणि ३८.१६ रुपयांना मिळणारे डिझेल ९१.५० रुपयांना विकत घ्यायला लावून केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला फसवणूक आणि लूट करत आहे. अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज केली. केंद्राच्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने राज्यभरातील विविध पेट्रोल पंपावर लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी राजधानीतील नेवगी नगर येथील पेट्रोल पंपावर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ते बोलत होते.

यावेळी सांताक्रूझ विभागाचे नेते रुडॉल्फ फर्नाडिस, विभाग अध्यक्ष सुशांत गोवेकर, युवा काँग्रेस विभाग अध्यक्ष क्लीबन जुड फर्नाडिस, प्रकाश साळकर, महादेव माडा (सेवादल प्रमुख, सांताक्रूझ), आर्शिया इनामदार, व्हिटोरीन फर्नाडिस यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंधन दरवाढीचा प्रतीकात्मक निषेध म्हणून गिरीश चोडणकर यांच्यासह काहींनी ‘सुटबुट’ घालून बैलगाडीतून प्रवास केला.

​कोविड काळामध्ये जनतेला धीर देण्याऐवजी ‘अच्छे दिन’च्या नावाखाली इंधन दरवाढ करून मोदी सरकार जनतेची लुबाडणूक करत ​आहे. अवघ्या ३५.६३ रुपये प्रति लिटर मिळणाऱ्या पेट्रोलवर व ३८.१६  रुपयांच्या डिझेलवर मोदी सरकार फ्रेट, कस्टम ड्युटी, बेसिक एक्साईज, स्पेशल ड्यूटी, कृषी पायाभूत सुविधा उपकर (एआयडीसी), रस्ता आणि पायाभूत सुविधा उपकर आकारत आहे. यामुळे यांच्या किमती अनुक्रमे ९३.८० आणि ९१.५० रुपये इतकी होते.  आणि हि सरळसरळ लूट आहे, अशी टिप्पणी चोडणकर यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारने रु. २२ लाख ७० हजार कोटी रुपये (२२,६९, १२२ कोटी) तर राज्य सरकारने १३ लाख ११ हजार २०० कोटी (१३,११,२००  कोटी) रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीं वाढवत जनतेकडून लाटले आहेत. ​यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ३६ आणि ३८ रुपये प्रति लिटर विकण्याची आग्रही मागणी केली. 

 

रुडॉल्फ फर्नांडिस यांनी यावेळी मोदी सरकारला ‘क्रूर’ असे संबोधत, या सरकारने भारतीय रुपया मजबूत करण्याची स्वप्ने दाखवत सत्ता मिळवली पण त्यांनी तर उलट रुपयाला कमकुवत तर केलेच वर देशातील जनतेचे देखील कंबरडे मोडले. हे सगळे थांबवून या सरकारने त्वरित देशातील इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी त्यांनी केली. 

सांताक्रूझ ​विभाग अध्यक्ष ​सुशांत गोवेकर कोविद काळातही अत्यंत असंवेदशील वागणाऱ्या मोदी सरकारने आतातरी थोडी माणुसकी दाखवावी आणि देशातील इंधन दरवाढ कमी करून जनतेच्या दुःखावर फुंकर घालावी अशी आग्रही मागणी केली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: