देश-विदेश

रामदेव बाबाविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली :
करोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅलोपथी औषधांवर टीका करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये बुधवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातला अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रामदेव बाबांवर जीवघेणे आजार पसरवण्याची कृती करणे, शांतता भंग करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IMA  च्या छत्तीसगड विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडून वापरण्यात येणाऱ्या अॅलोपथीच्या औषधांविषयी खोटी माहिती पसरवण्याचा आरोप रामदेव बाबांवर करण्यात आला आहे. त्यासंदर्भातली तक्रार आयएमएनं केल्यानंतर त्यांच्यावर भादंवि कलम १८८, कलम २६९ आणि कलम ५०४ अनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूरचे पोलीस अधीक्षक अजय यादव यांनी ही माहिती दिली आहे.

यासंदर्भात आयएमएच्या हॉस्पिटल बोर्डचे संचालक आणि रायपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. राकेश गुप्ता आणि विकास अगरवाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षभरापासून योगगुरू रामदेवबाबा चुकीची माहिती पसरवत आहेत. त्याशिवाय, सोशल मीडियावर व्हायरल झालेली त्यांची धमकीवजा विधानं, वैद्यकीय क्षेत्र, आयसीएमआर आणि इतर फ्रंटलाईन संघटनांबाबतची मांडलेली भूमिका यावर तक्रारीमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे. उपचारांविषयी गैरसमज पसरवणारे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं देखील या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: