गोवा 

‘गोव्यात आजही नागरी स्वातंत्र्याची गळचेपी’

मडगाव:
गोव्यात नागरी स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने 75 वर्षापूर्वी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी त्याविरुद्ध आवाज उठविला. आज गोव्यात तीच स्थिती आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंतही नागरी स्वातंत्र्याची अशीच गळचेपी करत आहेत. कुणी सरकारवर टीका केली तर ती गोव्याची बदनामी असे त्यांना वाटते, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

75 व्या गोवा क्रांतिदिनी ऐतिहासिक लोहिया मैदानावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 75 वर्षांपूर्वी याच मैदानावरून डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. जुलीयांव मिनेझिस यांनी सालाझाराच्या हुकूमशाहीच्या विरोधात नागरी उठाव चळवळ सुरू केली होती, आज पुन्हा अशी चळवळ सुरू करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

विरोधी मत ही लोकशाहीची गरज असून कुणी ते दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. मात्र सावंत सरकारच्या राज्यात आवाज उठविणाऱ्या महिलांना बुटाखाली चिरडले जाते, मुलांना अटक होते आणि लोकांकडे सतत दुर्लक्ष होत आहे. गोवेकारांना नागरी स्वातंत्र्य मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य नव्हे का असा प्रश्न त्यांनी केला. सध्या गोव्यात लोकांचा आवाज ज्या तरेने दाबला जातो ते पाहिल्यास 1946 ची स्थिती आणि आजची स्थिती यात काही फरक जाणवतो का असा सवाल त्यांनी केला.

किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आराखडा सुनावणी, शांततेत चाललेले मोले आंदोलन, म्हादई प्रश्न आदी हाताळताना सावंत सरकारने नागरी स्वातंत्र्याची पूर्णपणे गळचेपी केली आहे. लोकांचा आवाज दाबला गेला. मात्र या साऱ्याचे या सरकारला उत्तरे द्यावे लागतील याची सरकारने जाणीव ठेवावी असे सरदेसाई म्हणाले.

गोवा क्रांती दिनाच्या अमृत महोत्सवी घटकेस बोलताना गोवेकारांनी पूर्वीच्या मुक्ती लढ्यापासून प्रेरणा घेत 2022 साली या सरकारच्या तावडीतून गोवा मुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. 2022 हे वर्ष गोव्याची नवी ओळख करून देनारे असेल असे सरदेसाई म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: