गोवा 

तौक्ते बळींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख

पणजी :
काही दिवसांपूर्वी राज्यात थैमान घालणाऱ्या तौक्ते चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केली आहे. आज मझलवाडा-हणजूण येथील मृत्युमुखी पडलेल्या शीतल महादेव पाटील हिच्या कुटुंबियाकडे 4 लाख रूपयांचे मंजूरीपत्र देण्यातही आले. माशेल येथील किशोर उर्फ केशव जगन्नाथ नाईक (47) यांचाही या वादळाने बळी घेतला आहे.
राज्यात तौक्ते चक्रीवादळाने जिवितहानीसह प्रचंड वित्त हानी झाली. सरकारने केलेल्या प्राथमिक अहवालानुसार हा आकडा 30 ते 40 कोटी रूपयांवर पोहचला आहे. अजूनही राज्यातील अनेक भागांत वीज पुरवठा पूर्ववत होऊ शकलेला नाही. शेती, बागायतींचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल बनलाय. एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळाचा फटका यामुळे गोव्यातील जनजीवन प्रचंड विस्कळीत आणि प्रभावीत झाले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंगळवारपासून ठिकठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गुरूवारी त्यांनी सर्व तालुक्यांचा स्वतंत्र आढावा घेतला. वीज, पीडब्लूडी, डब्लूआरडी आदी खात्यांचे कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र काम करत आहेत. जनजीवन सुरळीत करण्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. चक्रीवादळातील पिडीतांना शक्य तितक्या लवकर भरपाई देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले आहे.
कृषीमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी सर्व क्षेत्रिय कृषी अधिकाऱ्यांना शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश दिलेत. प्राथमिक अंदाजानुसार 3 ते 4 कोटी रूपयांचे शेतीचे नुकसान झालंय. शेतकरी तसेच बागायतदारांना भरपाई देण्यासंबंधी ते मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून निर्णय घेणार आहेत,अशीही माहिती मिळाली आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: