कला-साहित्य

‘स्टेट्स’वरचे ‘मिल्खा सिंग’

-अभयकुमार देशमुख

सोशल मिडियातील स्टेटसच्या निमित्ताने आज थोडं लिहावसं वाटलं. आता हा विषय म्हटल्यानंतर त्यावर काय लिहायचे असे प्रश्न उपस्थित होवू शकतात. आणि त्यामध्ये काही गैर नाही. सद्याच्या जीवनात सोशल मिडियाचा वापर हा अविभाज्य घटक बनला आहे. या सोशल मिडियाशिवाय जगणे एवढं सोप्प राहिलं नाही. पण कधी कधी या सोशल मिडियाचा नको तेवढा अतिरेकही होतोय. हे नाकारता येणार नाही. आज वॉट्सअप, फेसबुक, इस्टाग्राम, ट्विवर यासारख्या अनेक समाजमाध्यमांवर स्टेटस ठेवून आपले मत व्यक्त करण्याची आवड निर्माण झाली आहे. ती जोपासण्यात चूक काहीच नाही. ज्याने त्याने आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल किंवा आवडत्या विषयांवर स्टेटस ठेवून व्यक्त होणं ही चांगलीच बाब आहे. उलट यामुळे अनेकांना ज्या घटना माहित नसतात. त्या घटना आपल्या संपर्कातील व्यक्तीने ठेवलेल्या स्टेटसमुळे कळतात.

पण कालचा दिवस हा भारतीयांसाठी दुखद होता. भारताचे महान ​धावपट्टू मिल्खा सिंह याचं निधन झालं. अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरच्या भाग मिल्खा भाग या चित्रपटामुळे मिल्खा सिंह ब-यापैकी भारतीयांना माहित झाले. त्यापुर्वी मिल्खा सिंह देशवासियांना माहित नव्हते. असं होतं का ? तर अजिबात नाही. पण नव्या पिढीला हे नाव तितकेसे परिचित नव्हते. ​कारण आत्ताची युवा पिढी वाच​नापासून दुर आहे. आपल्या देशाचा इतिहास जाणून घेण्यात त्यांना स्वारस्य नाही. देशातील मिल्खा सिंह यांच्यासारख्या असामान्य व्यक्तींची कारकीर्द आपल्याला माहित असावी, अशी रुची असणारी युवा पिढी दुर्मीळ होत चाचलीय. उदाहरण सांगायचे झाले. ​एखाद्या बॉलिवुडच्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या बाबतीत जर कोणती घटना घडली. तर त्याबाबत मिडियासहीत सर्व सोशल मिडियाची जमात चार पाच दिवस लिहित राहते. बोलत राहते. अर्थात जे सत्य आहे. आणि जे गरजेचे आहे. ते लिहिण्याला किंवा बोलण्याला कोणाची ना नाही. पण पुन्हा प्रश्न येतो एकांद्या बॉलिवुडच्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट आला म्हणून स्टेटस ठेवणा-यांना मिल्खा सिंह यांच्यासारख्या महान खेळाडूंचा इतिहास येणा-या नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी स्टेटस ठेवण्याची वृत्ती का येत नसावी? भारताचे नाव उज्वल करणा-या हर एक व्यक्तीला नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आपली आहे. हे आपण विसरत तर चाललो नाही ना ?

आता यावरही काहीजण बोलतील की या अशा असामान्य व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वांपर्यंत पोहचतात. आणि हे सत्य नाकारता येणार नाही. ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे. ज्याचं काम चांगलं आहे. त्याला कोणी मोठा करु शकत नाही. ते ​स्वतःच मोठे होत असतात. असं असलं तरी हल्ली छोटा भीम, डोरेमॅन, स्पायडरमॅन, हंक पाहण्यासाठी रडणारी मुलं घराघरात दिसू लागली आहेत. त्यामुळे त्यांना योग्य आणि चांगल्या गोष्टींची रुची लावण्यासाठी आपल्याला त्यावर बोलणे, लिहिणे आवश्यक आहे. हे कोणाला समजावून सांगण्याची गरज वाटत नाही.

आपल्या कर्तृत्वाने जगभरात नाव कमावणा-या मिल्खा सिंग यांना युवा पिढीने तितकेसे लक्षात ठेवलं नाही. हे कालच्या दिवभरातील घडामोडींवरुन दिसून आले. ​कशाच्या मागे धावताना आज आपण नेमके कोणाला विसरत चाललो आहोत हे लक्षात  घेणे जास्त गरजेचं आहे. म्हणूनच हा लेखनप्रपंच.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: