गोवा 

”हे’ तर भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे स्मारक’

अटल सेतूवरील कोसळलेल्या विजेच्या खांबावरून काँग्रेसची टीका

पणजी :
अटल सेतूवर कोसळलेला विजेचा खांब हे भाजपच्या भ्रष्ट राजकारणाचेच स्मारक असून, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रशासन किती भ्रष्ट होते याचेच दर्शन यातून होते, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते तुलियो डिसोझा यांनी केली.

 

मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलावरील विजेच्या खांबामध्ये ४५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे काँग्रेसने निदर्शनास आणले होते. आज कोसळलेला खांब हे याच भ्रष्टाचाराचे फलित आहे. भ्रष्ट व यु टर्न मास्टर दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेणारे हे सगळे उघड्या डोळ्याने बघतच आहेत, असा टोमणाही यावेळी तुलियो डिसोझा यांनी मारला आहे.

 

८०० कोटी रुपये खर्चाच्या या मांडवी नदिवरील या तिसऱ्या पुलाच्या एकूण कामामध्ये राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले असून, या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार  आणि ‘कमिशनबाजी’ झाली असल्याचेही तुलियो डिसोझा यांनी यावेळी नमूद केले.

 

आपले नाव पुलाच्या उद्घाटन फलकावर कोरले जावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पुलाचे घाईगडबडीत उद्घाटन केले. दुर्दैवाची बाब म्हणजे आजतागायत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला नाही, या पुलावरील दोन मार्गिका आजही बंदस्थितीतच आहेत.

पुलाचे उदघाटन झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच या पुलाला तडे गेले असून त्याचीहि डागडुजी अद्याप झालेली नाही. पुलावरच्या रस्स्त्यांमध्ये आता खड्डेदेखील निर्माण झाले आहेत. भरीसभर म्हणजे कंत्राटदाराने या पुलाखाली पडलेले कॉंक्रीटचे अवशेष अद्यापदेखील काढलेले नाहीत. हा पूल म्हणजे भाजपच्या भ्रष्ट राजवटीचे उत्तम उदाहरण आहे, असेही यावेळी तुलियो डिसोझा यांनी सांगितले.

आज पडलेल्या या विजेच्या खांबानंतर आता या पुलावरील इतर विजेचे खांब एकामागून एक पडून नागरिकांच्या, चालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने या पुलाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून नागरिकांना आश्वस्त करावे व सुरक्षेची उपाययोजना करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने करत असल्याचे तुलियो डिसोझा यांनी सांगितले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: