गोवा 

काय ठरणार भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत?

पणजी :
भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला गती देताना पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक उद्या​,​ मंगळवारी २९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बोलावली आहे. भाजपचे राज्य प्रभारी आमदार सी‌. टी. रवी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

पणजीतील दयानंद स्मृती इमारतीतील सभागृहात होणाऱ्या या बैठकीस मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, सर्व आमदार, भाजपचे सर्व प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, विविध मोर्चांचे पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, गाभा समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना भाजपने सर्व मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड यांनी चाळीसही मतदारसंघातील मंडळ पातळीवरील बैठका तसेच जिल्हा पातळीवरील बैठका यापूर्वीच घेतल्या आहेत. संघटनात्मक पातळीवर अनेक कार्यक्रम येत्या काही महिन्यांमध्ये भाजप राज्यभरात राबवणार आहे. राज्य सरकारने केलेली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत यासाठी या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत विविध राजकीय ठरावही संमत केले जाणार आहेत.

 

भाजप विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे की युती करून लढवणार आहे याविषयी विविध राजकीय पक्षांनाही मतदारांप्रमाणेच उत्सुकता आहे. उद्याच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयीचे काही संकेत मिळू शकतील. सध्या भाजपमध्ये एकेका विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही राज्य कार्यकारीणीची महत्त्वाची बैठक होणार आहे.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: