गोवा 

हरमलच्या सरपंचपदी मनोहर केरकर बिनविरोध

पेडणे (प्रतिनिधी) :
हरमल पंचायतीच्या सरपंचपदी मनोहर केरकर यांची बिनविरोध निवड करण्यात  आली. दरम्यान सरपंच केरकर याना खंबीरपणे साथ देऊन सर्व पंच सदस्यांनी गांवच्या विकासाला गती देण्याचे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देताना केले.

आज बुधवार दि.३० रोजी झालेल्या हरमल पंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत मनोहर केरकर यांचा एकमेव अर्ज सरपंचपदासाठी आल्याने उपस्थित पंच सदस्य अनंत गडेकर,ईनासियो डिसोझा,बर्नार्ड फेर्नांडीस, मनिषा संतोष नाईक, प्रतिक्षा नरेश नाईक व दिव्या दिलीप वायंगणकर आदीनी मनोहर केरकर याना सरपंचपदासाठी समर्थन दिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी सरपंच सौ.प्रतिक्षा नाईक यांनी १४ जुन रोजी पंचायत मंडळांतील सत्तेवरील गटांत खाजगीत झालेल्या अलिखित कराराप्रमाणे पंचायत संचालकांकडे राजीनामा सादर केला होता.निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून गट विकास कार्यालयाचे अधिकारी कृष्णा गडेकर यांनी काम पाहिले.त्यांना पंचायत सचिव दशरथ परब यांचे सहकार्य लाभले.पंचायत मंडळांतील एकूण नऊ पंचायत सदस्यांपैकी ७ पंच सदस्य उपस्थित होते.पंच सदस्य प्रविण वायंगणकर व पंच गुणाजी ठाकूर यावेळी अनुपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सरपंच केरकर म्हणाले कि,आतापर्यंत हरमल पंचायतीने बरीचशी विकास कामे मार्गी लावलेली आहेत,तसेच सद्या सार्वजनिक बांधकाम व अन्य खात्यांतर्गत कामांच्या निविदा मंजुरीसाठी असल्याने आमदार दयानंद सोपटे यांच्या सहकार्याने त्या कामांना चालना दिली जाईल.आतापर्यंत आमदार सोपटेंचे  पूर्ण सहकार्य मिळत असल्याने येथील विकासाला गती मिळाल्याचे सरपंच केरकर म्हणाले.यावेळी मांद्रे मतदारसंघाचे आमदार व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पंचायत कार्यालयांत उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच केरकर यांचे अभिनंदन करून त्यांना सरपंचपदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.आपल्या मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येक पंच सदस्याने नवनिर्वाचित सरपंच केरकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून प्रत्येक प्रभागातील कामांना चालना द्यावी.त्यासाठी आमदार या नात्याने आपण आतापर्यंत दिलेले आपले पाठबळ तुमच्यासोबत कायम राहील याची ग्वाही आमदार सोपटे यांनी यावेळी दिली.
गावचा सर्वांगीण विकास हीच पंचायत मंडळाच्या यशस्वी कार्याची पावती असल्याचे सोपटे म्हणाले.यावेळी त्यांच्यासमवेत पर्यटन विकास महामंडळाचे संचालक सुदेश सावंत,मांद्रे भाजप मंडल अध्यक्ष मधू परब व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: