गोवा 

”त्या’ सर्व ३९७४ कार्यकर्त्यांची करा विनाविलंब सुटका’

पणजीः
कारागृहात असलेल्या वयोवृध्द फादर स्टेन स्वामी यांच्या शासकीय हत्येच्या निषेधार्थ गोवा प्रदेश काँग्रेसने आज पणजीतील आझाद मैदानावर आयोजित सभेत केंद्रातील मोदी सरकारचा जोरदार निषेध केला. देशभरातील निरपराध अशा ३ हजार ९७४ कार्यकर्त्यांची विनाविलंब सुटका करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या निषेध सभेला गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष वरद मार्दोळकर, एनएसयुआय अध्यक्ष नौशाद चौधरी, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष ज्यो डायस, प्रवक्ते तुलिओ डिसोझा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले, दलित आणि आदिवासींसाठी कार्यरत  फादर स्टेन स्वामी यांचा हा भाजप सरकारने केलेला खूनच आहे. फादर स्टेन यांच्या बलिदानातून देशाने आता मोदी पुरस्कृत दादागिरीविरूध्द उठाव करून राष्ट्रीय संवेदना जागी करण्याची गरज आहे. गोमंतकीय जनतेने देखील या उठावात सहभागी झाले पाहिजे. फादर स्टेन यांची हत्या हे देशात अघोषित आणीबाणी असल्याचे लक्षण आहे. देशभरातील तुरूंगात डांबून ठेवलेल्या निरपराध लोकांची सरकारने विनाविलंब सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अर्णव गोस्वामीसारख्या पत्रकारासाठी अर्ध्या रात्री न्यायालये आणि प्रशासनाचे दरवाजे उघडणारे सरकार निरपराध फादर स्टेन यांना साधी माणुसकीची वागणूक देऊ शकले नाही, असे चोडणकर म्हणाले.

दिगंबर कामत म्हणाले, न्यायालयाने फादर स्टेन यांना इस्पितळात ठेवण्यासाठी आदेश दिलेला असतानाही सरकार त्यांना वाचवू शकले नाही. सरकार विरोधात अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याची परंपरा महात्मा गांधी यांनी सुरू केली. जनतेच्या या मूलभूत हक्काची पायमल्ली कुठलेही सरकार करू शकत नाही. पण आपल्या देशात लोकशाही राहिलेली नाही. लोकांनी या शासकीय अतिरेकाविरूध्द उठाव करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

फादर स्टेन स्वामी हे दीन दलितांसाठी कार्य करणारे समाजसेवक होते, आसे बीना नाईक यांनी सांगितले. प्रवक्ते तुलिओ डिसोझा यांनी फादर स्टेन स्वामी यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये, असे सांगितले. फादर स्टेन स्वामी यांना झालेल्या अटकेबाबत रूडल्फ फर्नांडिस यांनी प्रश्न उपस्थित केला. वेळ्ळीतील काँग्रेस नेते साविओ डिसिल्वा म्हणाले, फादर स्टेनसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजप सरकारने केलेला खून वेदनादायी असून प्रत्येक नागरिकाने त्याचा निषेध केला पाहिजे.

या निषेध सभेला माजी आमदार व्हिक्टर गोन्सालवीस, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष नेविल डिसोझा, सरचिटणीस प्रदीप नाईक, खेमलो सावंत, इव्हर्सन वालेस , सचिन परब, विरेंद्र शिरोडकर, आर्चित नाईक, प्रतिभा बोरकर यांच्यासह महिला व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: