महाराष्ट्रदेश-विदेश

बार्ज दुर्घटनेतील 49 मृतदेह सापडले

मुंबई :
चक्रीवादळामुळे समुद्रात बार्ज बुडून झालेल्या दुर्घटनेतील एकूण 49 मृतदेह हाती लागले आहेत तर अद्यापही 26 जण बेपत्ता आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त करतानाच 186 जणांना वाचविल्याबद्दल नौदलाची व तटरक्षक दलाची प्रशंसा केली आहे.

सोमवारी बुडालेल्या पी 305 बार्जमधील कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी नौदलाच्या युद्धनौकांवरील नौसैनिकांनी अथक प्रयत्न केले होते. मंगळवारी 186 लोकांना वाचविल्यानंतर आतापर्यंत बार्जवरील कोणीही कर्मचारी जिवंत सापडले नाहीत. काल रात्रीपर्यंत 26 मृतदेह मिळाले होते, तर आज सकाळी एकूण 37 मृतदेह मिळाले होते. संध्याकाळी मुंबईत आलेल्या आयएनएस बियास युद्धनौकेतून आणखी मृतदेह आल्याने ही संख्या 49 झाली. अद्यापही नौदलाच्या युद्धनौका, हेलिकॉप्टर तसेच टेहळणी विमानांमधून बेपत्ता 26 जणांचा शोध सुरु आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच 186 लोकांना वाचविणाऱ्या नौसैनिकांची व तटरक्षक दलाच्या जवानांची प्रशंसा केली आहे. वादळाच्या तांडवातदेखील नौदल व तटरक्षक दलाच्या जवानांनी धाडसाने पूर्ण केलेली शोधमोहीम कौतुकास्पद आहे. त्यांच्यामुळेच 186 जीव वाचले, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: