गोवा 

”त्या’ गद्दारांना आगामी निवडणुकीत धडा शिकवा’

म्हापसा :
विभाग अध्यक्ष अतुल नाईक यांच्या सक्षम आणि सक्रिय नेतृत्वानुसार सालीगाव विभाग काँग्रेसने अथक परिश्रम केले असून, त्यांच्या मेहनतीमुळेच परिसरात काँग्रेसला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे. या मतदारसंघात बूथस्तरापर्यंत पक्ष रुजला असून, याबद्दल संपूर्ण विभाग कमिटी कौतुकास पात्र आहे असे उद्गार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काढले. सालीगाव काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अग्नेलो फर्नाडिस, ऍड. यतिश नाईक, प्रवक्ते टुलिओ डिसोझा, जिल्हा अध्यक्ष विजय भिके, जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, भोलानाथ घाडी, सेवा दल समन्वयक शंकर किर्लपालकर, विभाग अध्यक्ष अतुल नाईक, महिला अध्यक्ष सोनल मालवणकर, युवा अध्यक्ष चंद्रकांत मांद्रेकर आदी उपस्थित होते.

यावेळी सालीगाव विभाग काँग्रेसने एकदिलाने पक्षासाठी काम करण्याचा निर्धार केला. आणि  कोणत्याही युती, आघाडीशिवाय काँग्रेस स्वबळावर आगामी निवडणूक लढवू शकते हे नमूद करत गेल्या निवडणुकीनंतर जनादेशाचा अपमान करणाऱ्या गद्दारांना आगामी निवडणुकीत जनतेच्या माध्यमातून योग्य तो धडा शिकवण्याचाही पुनःउच्चार करण्यात आला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी सालीगाव काँग्रेस कार्यकर्त्यांना आश्वस्त केले कि, सालीगाव मतदारसंघात कोणाहीसोबत आघाडी करण्यात येणार नसून पक्ष याठिकाणी स्वबळावर लढणार आहे. राज्य सरकारच्या अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचारामुळेच तीन हजार निष्पाप गोमंतकीयांना कोविडकाळात आपल्या जीवाला मुकावे लागले असून, याला राज्य सरकारचा सर्वस्वी जबाबदार असल्याचेही यावेळी चोडणकर यांनी नमूद केले.

congress goaयावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना असे आवाहन केले कि, जनसामान्यांमध्ये जाऊन पक्ष कार्य पोहोचवावे आणि सालीगावमध्ये काँग्रेसच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे. भाजप सरकारने नागरिकांना दिलेले नोकरीचे आश्वासन कसे वाऱ्यावरच विरले असून, गोव्यात सुमारे ३५ टक्के युवक आजही बेरोजगार आहेत याकडे कार्यकर्त्यांनी जनतेचे लक्ष वेधावे असेही आवाहन यावेळी चोडणकर यांनी केले.

भाजपने केलेल्या इंधन दरवाढ आणि महागाईमुळे सवर्सामान्य माणूस सर्वार्थाने पिचला गेला असल्याचेही यावेळी गिरीश चोडणकर यांनी नमूद केले.

सर्वसामान्य कार्यकर्ता हीच काँग्रेसची खरी ताकद असून त्यांच्यामुळे पक्ष तळागाळात पोहोचून दिवसागणिक अधिकाधिक सक्षम होत असल्याचे विजय भिके यांनी सांगितले.

काँग्रेसने कोणाहीसोबत आघाडी करू नये आणि पक्ष श्रेष्टींनीं आगामी निवडणुकीसाठीचे उमेदवार लवकरात लवकर जाहीर केले तर त्यांना काँगेसचे विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवणे सोपे जाईल असे मत यावेळी ऍड. यतिश नाईक यांनी मांडले.

काँग्रेस प्रवक्ते टुलिओ डिसोझा यांनी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पक्षाच्या विजयासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

भोलानाथ घाडी यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन करत काही महत्वपूर्ण सूचना केल्या. विभाग प्रमुख अतुल नाईक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर सॅन्ड्रा फर्नांडिस यांनी आभार मानले. समीर नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: