लेखसिनेनामा

पडद्यावरचा ग्रेट खलनायक; वास्तवातील चांगला माणूस !

  • डॉ. श्रीमंत कोकाटे

माझ्या “विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज” या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी निळू फुले प्रमुख पाहुणे होते .कार्यक्रम पत्रिका देण्यासाठी आम्ही घरी गेलो त्यावेळेस ते म्हणाले ” मी निश्चित येतो, काळजी नसावी” कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आम्ही त्यांना फोन केला, “आपल्याकडे गाडी पाठवतो आपण यावे” ते म्हणाले “गाडी नको, मी माझ्या गाडीने येतो”

निळू फुले त्यांच्या एका मित्रासह कार्यक्रमाच्या अगोदर अर्धा तास एका रिक्षाने कार्यक्रम स्थळी आले. त्यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती अत्यंत महत्त्वपूर्ण भाषण केले. कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी पुरूषोत्तम खेडेकर साहेब, पी. ए. इनामदार साहेब, प्रवीणदादा गायकवाड, रवींद्रआण्णा माळवदकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.निळू फुले यांना आम्ही जेवणासाठी खूप आग्रह केला , परंतु निळूभाऊ म्हणाले “आमचे एक नियोजित जेवण आहे, त्यामुळे मी थांबू शकत नाही. मला माफ करा”. आम्ही त्याना मानधनाचे पाकीट दिले, त्यावेळेस त्यांनी नम्रतापूर्वक ते आम्हाला परत केले व ते म्हणाले “तुम्ही इतके चांगले काम करता, त्यामुळे मीच तुम्हाला मदत करायला हवी. मला मानधन नको. माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत” असे ते म्हणाले

निळू फुले हे रुपेरी पडद्यावर अत्यंत प्रभावशाली खलनायक होते.माझी आजी तर चित्रपटातील निळू फुले पाहिले की म्हणायची “कडू मुडदा आला बघा,कसा मरणाय कुणास ठाऊक” हा निळूभाऊ यांच्या अभिनयाचा मोठा पुरस्कार होता.पुस्तक प्रकाशनाच्या कांही दिवस अगोदर माझी आजी वारली.ती जिवंत असती तर नक्की मी तिला वास्तव जीवनातील अत्यंत गुणवान,विनयशील,अभ्यासू,दयाळू ,कृपाळू ,प्रेमळ ,परोपकारी, पुरोगामी असे महानायक निळूभाऊ दाखवले असते.

निळू फुले यांचा सहवास आम्हाला लाभला याचा आम्हाला खूप खूप आनंद वाटतो.त्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: