गोवा 

पेडण्यात भाजपचे नुकसान कसे भरून काढणार?

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :

निसर्गाने १६ मे रोजी पेडणे तालुक्यात पर्यायाने राज्यात चक्रीवादळाने करोडो रुपयांची नुकसानी झाली​. सार्वजनिक मालमत्ता यांची हानी झाली​. त्याची पाहणी आणि नुकसानी देण्यासाठी मंत्री आमदार अधिकारी त्या त्या भागात दौरे करतात आणि नुकसान भरपाई पैशाच्या रुपात देतात किंवा देणार आहे​. ​ त्याचबरोबर भाजपाची पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदारसंघातील मुळ भाजपा कार्यकर्त्यांची जी मोठी हानी झाली त्याची कशी नुकसानभरपाई करणार याकडे लक्ष लागून आहे​. ​

२०१७ च्या निवडणुकीत तर मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदार संघातून मूळ भाजपा कार्यकर्त्यांची नुकसानी मोठ्या प्रमाणात होत आहे, ती कशी भरून काढणार​? दोन्ही मतदारसंघातील मूळ भाजपा कार्यकर्त्यांचा वेगळा गट आजही कार्यरत आहे​. त्या गटाने भाजपशी आजही फारकत घेतली नाही​. परंतु पक्षाची नुकसानी या दोन्ही मतदारसंघातून झाली आहे, ती पैशाने भरून येणार नाही​. ​

​​मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न​ :
कोरगाव येथील जुन्या कार्यकर्त्यांची मने वळवण्यासाठी मागच्या आठ दिवसापुर्वी मुख्यमंत्री डॉ​. ​ प्रमोद सावंत हे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना घेवून कोरगाव येथे आले होते . जुन्या कार्यकर्त्यांची समजूत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी काढली . परतू इतर जे ​कार्यकर्ते पक्षापासून दूर जात आहे त्यांचे काय​? ​ त्याना अजून पर्यंत एकत्रित आणण्याचे प्रयत्न झाले नाहीत​. ​

​​मांद्रे मतदारसंघ
मांद्रे मतदारसंघात भाजपा पक्ष हा माजी मुख्यमंत्री प्रा. ​लक्ष्मीकांत पार्सेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढवला . हा मतदार संघ मगो पक्षाचा बालेकिल्ला होता , त्या काळातही पार्सेकर व त्यांचे समर्थक निवडणुकीच्या काळात एकाध्या रस्त्यावर कमळ रंगवायचे त्यावेळी भाजपा समर्थकाना विरोधक काय भाजीपाव करतात म्हणून हिणवायचे ३३३ मते पहिल्या निवडणुकीत पार्सेकर यांनी घेतली त्यावेळी त्यानाही वाटले नव्हते आपण कधी आमदार आणि मुख्यमंत्री होणार म्हणून ,जिद्दीला पेटलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी हळू हळू मांद्रे मतदार संघात वर्चस्व प्रस्तापित केले आणि सलग तीन वेळा पार्सेकर याना निवडून आणले .

​​२०१२ सालापासूनच वैर तयार झाले​ :​
विधानसभेच्या निवडणुकीसाठी २०१२ साली मतदारसंघ फेररचना करण्यात आली .पेडणे तालुक्यात धारगळ, पेडणे आणि मांद्रे असे तीन मतदार​​संघ असलेले धारगळ रद्द करून पेडणे आणि मांद्रे असे दोन मतदार​​संघ केले व पेडणे हा राखीव ठेवण्यात आला . त्यामुळे २००७ साली भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार दयानंद सोपटे यांचा २०१७ च्या निवडणुकीत पेडणे मतदार​​संघातून पत्ता कट झाला , सोपटे यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले होते त्यांनी २०१२ च्या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या आमदारकीचा त्याग केला आणि कॉंग्रेस प्रवेश करून २०१२ ची मांद्रे मधून पार्सेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली​. त्याच दिवसापासून पार्सेकर आणि सोपटे एकेकाळचे मित्र होते ते राजकीय शत्रू बनले .

सोपटे यांचा २०१२ च्या निवडणुकीत पार्सेकर यांनी पराभव केला . तो पराभव सोपटे यांनी पचवला आणि २०१७ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री असतानाही पार्सेकर यांचा सोपटे यांनी पराभव केला आणि पराभवाचा बदला घेता , ते तिथे थांबले नाही , पार्सेकर यांच्या नाक्कावर टिच्चून २०१९ ची पोट निवडणूक भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले. मूळ ​कार्यकर्ते आजही सोपटे यांच्या विरोधात कार्यरत आहे . या मूळ भाजपा कार्यकर्त्याना एकत्रित आणण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही . मान्द्रेत पक्षाची मोठी नुकसानी झाली आहे ती नुकसानी कशी भरून काढणार ?

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पार्सेकर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि उमेद्वारी हि आपल्यालाच मिळेल असा ते विश्वास व्यक्त करतात . त्यामुळे आजही  मान्द्रेत भाजपचे दोन गट कार्यरत आहे , पार्सेकर गटाने आजही पक्षाशी फारकत घेतलेली नाही . दोन गट कार्यरत असल्याने पक्षाचे आणि आमदारांचे नुकसान होत आहे . नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायतिच्या निवडणुकीत मुळ भाजपा गट तटस्थ राहिल्याने दोन्ही भाजपला सीट गमवाव्या लागल्या .

​​पेडणे मतदार संघ
पेडणे मतदार संघातील जुन्या भाजपा कार्यकर्त्याना संघटीत करण्यासाठी यापूर्वी भाजपा गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे , मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बरेच प्रयत्न केले . मात्र त्यानाही यश आले नाही .ते बाबू आजगावकर याना आपला नेता मानायला तयार नाही , हि स्थिती अशीच राहिली तर २०२​२ ची निवडणूक दोन्ही मतदार संघातून भाजपाला हादरा बसू शकतो , याची पक्षाला जाणीव झाल्याने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे आपल्या पद्धतीने जुन्या कार्यकर्त्यांशी समेट घडवून आणत आहे , त्याना कितपत यश मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहेत . जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष नेते बदललीत कि नेत्यांनाच बदलतील अशी चर्चा चालू आहे. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: