कला-साहित्यगोवा सिनेनामा

उद्यापासून राज्यामध्ये ‘सिनेमांचे दिवस’

52 व्या इफ्फीत हेमामालिनी, प्रसून जोशी यांना ‘फिल्म पर्सनलिटी’ पुरस्कार

पणजी : 
उद्यापासून मांडवी तिरावर रंगणार्‍या भारताच्या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, राज्यात 20 नोव्हेंबर पासून पुढील आठ दिवस ‘सिनेमांचे दिवस’ असतील. कोरोनामुळे जानेवारी 2021 प्रमाणेच नोव्हेंबरमध्ये होणारा हा इफ्फीदेखील हायब्रीड प्रकारामध्ये होणार असून, या वर्षी 73 देशांतील विविध भाषांतील सुमारे 148 सिनेमांचा आस्वाद सिनेरसिकांना घेता येणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षीचा इफ्फी ‘आझादी का अमृत महोत्सव’, आणि ‘गोवा अ‍ॅट 60’ या संकल्पनेवर साजरा होणार असल्याची घोषणा सिनेमहोत्सव संचनालयाचे प्रमुख चैतन्य प्रसाद यांनी गोवा मनोरंजन सोसायटी इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी इफ्फीचा उद्घाटन सोहळा शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअम येथे होणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची यावेळी रेलचेल असणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेनिर्माता करण जोहर आणि मनिष पॉल करणार असल्याचे सांगण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर पणजी आयनॉक्स येथे ‘किंग ऑफ द वर्ल्ड’ या सिनेमाने महोत्सवाचा सिनेरंभ होणार आहे. यावर्षी इफ्फीमध्ये बॉलिवूडमधील अभिनेते सलमान खान, रणवीर सिंग, श्रध्दा कपूर, रितेश देशमुख, जेनेलिया डिसोझा, राशी खन्ना, मोनी रॉय आदींसह इतर कलाकार उपस्थित राहणार आहेत.

 

दरम्यान, या उद्घाटन कार्यक्रमामध्ये प्रसिध्द अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमामालिनी तसेच गीतकार तथा सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना इंडियन फिल्म पर्सनॅलिटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शिमला येथे केली.

iffi logo
‘ओटीटीं’ माध्यमांना विशेष स्थान
कोरोना काळात देशभरात आणि जगभरात ओटीटी माध्यमावरून सिनेमा पाहण्याच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेत यावर्षीच्या इफ्फीमध्ये ओटीटी माध्यमांना विशेष स्थान देण्यात आले आहे. काही व्यावसायिक ओटीटींवरून यावर्षी निवडक सिनेमे आणि मास्टर क्लास यांचे प्रसारण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इफ्फीच्या अधिकृत आभासी पडद्यावरूनही निवडक सिनेमे आणि मास्टर क्लास यांचे प्रसारण होणार आहे.

इफ्फीमध्ये 109 सिनेमांचे ‘प्रिमिअर’
यावर्षीच्या इफ्फीचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे विविध विभागांमध्ये मिळून तब्बल 109 सिनेमांचे प्रिमिअर शो होणार आहेत. म्हणजेच यावर्षीच्या 148 सिनेमांपैकी 109 सिनेमे हे इफ्फीच्या माध्यमातूनच पडद्यावर सर्वप्रथम येत आहेत. यामध्ये जागतिक प्रिमिअर (12) आंतरराष्ट्रीय प्रिमिअर (7), आशिया प्रिमिअर (26) तर भारतीय प्रिमिअर (64) सिनेमांचा समावेश आहे.

 

जगभरातल्या 94 देशांतून 624 सिनेमांनी यावर्षी इफ्फीसाठी आपले सिनेमे पाठवले होते.
– इफ्फीसाठी सुमारे तीन हजार सिनेप्रतिनिधींनी नोंदणी केली त्यापैकी दोन हजार जणांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
– इफ्फीच्या आभासी मंचावरून सुमारे 50 सिनेमांचे प्रसारण होणार आहे.
– यावर्षीच्या इफ्फीसाठी जगभरातून 40 मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे.
– दिलीप कुमार, पुनीत राजकुमार व अन्य मान्यवरांच्या सिनेमांचा श्रध्दांजली विभागात समावेश.
– मूळचे गोव्याचे असलेले प्रसिध्द सिनेसंकलक वामन भोसले यांच्या सिनेमांचा समावेश श्रध्दांजली विभागात करण्याबद्दल लवकरच निर्णय होणार.
– यावर्षीच्या इफ्फीसाठी गोवा राज्य सरकारकडून सुमारे 18 कोटी तर केंद्र सरकारकडून साडे नऊ कोटीपर्यंत खर्च करण्यात येणार आहे.
– इफ्फीसोबतच याच काळात ‘ब्रिक्स’ सिनेमहोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: