मुंबई 

अनाथ मुलांसाठी झाली ‘राष्ट्रवादी जिवलग’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
कोरोना काळात राज्यात अनाथ झालेल्या ४५० मुलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्ली येथून फेसबुक लाईव्हवरुन केली.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून राज्यात अनाथ झालेल्या ४५० मुलांसाठी प्रेमाचा आधार म्हणून
‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा हा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील एक सहकारी असे ४५० जण या ४५० कुटुंबांशी म्हणजे त्या मुलांशी जोडले जाणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी दूत’ निर्माण केला असून यामध्ये मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर मुलांसाठी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता जोडला जाणार आहे असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.

‘राष्ट्रवादी दूत’ या ४५० अनाथ मुलांच्या घरात जाईल. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाकडे देणार आहे. शिवाय या अनाथ मुलांची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे तो डाटाही जमा केला जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम व पारदर्शक कारभार केला जाणार आहे. शिवाय यांची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाईटवर व स्वतः माझ्या पेजवर उपलब्ध राहिल असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.

या अनाथ मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून केले जाणार आहे असेही सुप्रियाताई सुळे यांनी जाहीर केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार असून आज दिल्लीतून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या योजनेची घोषणा करताना या योजनेची संकल्पना अंमलात आणणार्‍या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतानाच अजितदादांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छाही दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: