गोवा 

‘म्हादई, खाण व्यवसाय, बेरोजगारी व CZMPवर नड्डा यांनी भूमिका स्पष्ट करावी’

पणजी :
अटलसेतूकडील झेंडा नसलेला ध्वजस्तंभ तसेच आदिलशहा राजवाड्यासमोरील मोडलेल्या ध्वजस्तंभाने आज भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आगमनावेळी  भाजपचे बेगडी देशप्रेम गोमंतकीयांच्या समोर उघड झाले आहे अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते ॲड. श्रीनिवास खलप यांनी केली आहे.

गोवा भेटीवर आलेल्या भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हादई, पर्यावरण नष्ट करणारे तिन प्रकल्प, किनारी व्यवस्थापन आराखडा, खाण व्यवसाय व बेरोजगारी यावर भाष्य करून भाजपची भूमीका स्पष्ट करावी अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्त्याने केली आहे.

आज अनेक महिने होऊन गेले तरी अटल सेतूकडील ध्वजस्थंभावरचा राष्ट्रध्वज गायब आहे. आदिलशहा राजवाड्यासमोरचा ध्वजस्थंभ मोडकळीस आलेला आहे व त्याची साधी दुरूस्ती करणे भाजप सरकारला जमलेले नाही.

दुर्देवाने, हेच बेजबाबदार भाजप सरकार धन व शक्ती वापरून जे. पी. नड्डांच्या स्वागतासाठी संपुर्ण मार्गावर झेंडे, फलक व बॅनर लावते यावरुन भाजपला देशप्रेमापेक्षा पक्षप्रेम महत्वाचे हे स्पष्ट होते असे ॲड. श्रीनिवास खलप यांनी केला आहे.

भाजपने लोकांची दिशाभूल करण्यासाठी नेहमीच राष्ट्रप्रेमाचा खोटा अजेंडा पूढे आणला. लोकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यापेक्षा लोकांसमोर राष्ट्रप्रेमाचे नाटक करुन भाजपने नेहमीच देश व जनतेच्या भावनांशी खेळ मांडला आहे.

भाजप सरकारने आई म्हादई कर्नाटकला का विकली?, पर्यावरण, वने व वन्यप्राण्यांचा नाश करुन गोव्यात “कोळसा हब” का सुरू करण्याचा भाजपचा बेत आहे? लोकांच्या भावनांचा आदर न करता बेकायदेशीरपणे किनारी व्यवस्थापन आराखडा तयार करुन भाजप गोवा ‘क्रोनी क्लब’च्या घशात का टाकत आहे? सन २०१२ मध्ये भाजपने घोषणा केलेले रोजगार कुठे गेले? सन २०१२ मध्येच स्व. मनोहर पर्रिकरांनी बंद केलेला खाण व्यवसाय भाजपने आज पर्यंत का सुरू केला नाही? या प्रश्नांचे उत्तर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गोमंतकीयांना देणे गरजेचे आहे.

srinivas khalap
श्रीनिवास खलप

गोव्यातील भाजप सरकारने  ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे सुमारे २०० कोविड रुग्णांचे  बळी घेतले व त्यांचा जगण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला. मोदींचे “टाळी बजाव-थाळी बजाव- दीया जलाव” उत्सव साजरे करण्यात व्यस्त राहिलेल्या  भाजप सरकारने कोविड महामारी हाताळण्याची कोणतीच तयारी केली नाही व लोकांना कोविडच्या जबड्यात ढकलले गोव्यात ३००० पेक्षा जास्त  लोकांचे प्राण गेले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांनी यासाठी जनतेची माफी मागणे गरजेचे आहे.

आज गोव्यात पेट्रोलचे दर प्रती लिटर शंभर झाले आहेत. भाजप सरकारनेच सदर दर रु. ६० प्रती लिटरच्या वर जाणार नाहीत हे आश्वासन लोकांना दिले होते. गोव्याची अस्मीता व गोमंतकीयांचे भवितव्य यावर बोलण्याचे धाडस जे.पी. नड्डांनी दाखवावे अशी मागणी ॲड. श्रीनिवास खलप यांनी केली आहे.

भाजप अध्यक्षांना या विषयांवर भाष्य करायला वेळ नसेल. जे.पी.नड्डा केवळ भाजपची जुमलाबाजी व फेक राजकारणावरच बोलतील असा टोला खलप यांनी हाणला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: