सातारा 

कास-गणेश खिंडीत उभारणार प्रेक्षागॅलरी

सातारा​ (महेश पवार) :

गेल्या काही दिवसांपासून पोवई नाका येथील छ. शिवाजी महाराज पुतळा आणि शिवतिर्थाचे ​सुशोभिकरण करण्याचे काम वाढीव निधी अभावी रखडले आहे. पालकमंत्र्यांशी चर्चा करून वाढीव निधी उपलब्ध करू. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करा अशा सूचना ​आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागाला केल्या. दरम्यान, सातारा- कास रस्त्यावर गणेश खिंड येथे प्रेक्षागॅलरी उभारण्याबाबत चर्चा झाली असून गॅलरी उभारण्याचा निर्णयही झाला.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, महेंद्र देसाई यांच्यासह बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, संजय उत्तुरे, उप अभियंता राहुल अहिरे, शाखा अभियंता रवी अंबेकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पेशवे, उप अभियंता खैरमोडे, निकम आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून पोवई नाक्यावरील शिवतीर्थाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून निधी अपुरा पडल्याने हे काम रखडले आहे. निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करणार असून निधी उपलब्ध होईल. निधी मिळाला की तातडीने हे काम पूर्ण करून शिवप्रेमींसाठी शिवतिर्थ खुले करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सातारा- कास रस्त्यावर गणेश खिंड येथे पर्यटकांच्या सोयीसाठी प्रेक्षागॅलरी उभारावी अशी सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली असून तशी प्रेक्षागॅलरी उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच कासला जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेने बॅरियर्स बसवण्याच्या सूचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या.

पोवई नाका, जुना आरटीओ ते वाढेफाटा या रस्त्याचे रुंदीकर करताना मोठी झाडे तोडू नका तसेच रस्त्याच्या कडेला वॉकिंग ट्रॅक तयार करा या सूचना पुन्हा एकदा त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. याशिवाय शाहूपुरी पोलीस ठाणे ते शाहूपुरी चौकाकडे जाणारा रस्ता, म्हसवे ते कारंजे रस्ता यासह विविध रस्त्यांची कामे याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीत झालेले विषय तातडीने मार्गी लावा तसेच कामे दर्जेदार करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: