सातारा 

शिवेंद्रसिंहराजेंनी केली परळी भागाची पाहणी

'राष्ट्रमत'च्या ​बातम्यांची आमदारांनी घेतली दखल 

सातारा (महेश पवार) :
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज सातारा तालुक्यातील परळी भागात जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. शिंदेवाडी येथील खचलेला आणि खराब झालेला रस्ता, रेवंडी घाटात दरड कोसळली, पांगारे- पळसावडे रस्त्याचे झालेले नुकसान, पांगारे धरण, सांडवा आणि कॅनॉलचे झालेले नुकसान, सोनवडी येथील पुलाचे झालेले नुकसान आणि विविध भागातील पिकांचे नुकसान याची पाहणी करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना करून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यात सुरु असलेल्या धुंवाधार पावसाच्या आणि ठिकठिकाणी झालेल्या हानीच्या बातम्या ‘राष्ट्रमत’च्या माध्यमातून प्रसारित होत आहेत. जिल्ह्यातील जनता ‘राष्ट्रमत’कडे आपल्या दुःखाला वाचा फोडत आहे. या सगळ्या बातम्यांची आणि लोकांच्या आवाहनाची दाखल घेत आमदार शिवेंद्रराजे यांनी आज मतदारसंघातील विविध भागात पाहणी दौरा केला.

अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे सातारा आणि जावली तालुक्यात दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणी पूल वाहून गेले, काही ठिकाणी दरड कोसळल्या, घरांची पडझड झाली, रस्ते खचले तर पिकांचे मोठे नुकसान झाले असून यातून जनतेला सावरण्यासाठी सातारा आणि जावली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पायाला भिंगरी बांधली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाची तमा न बाळगता आ. शिवेंद्रसिंहराजे मतदारसंघातील प्रत्येक भागात भेटी देत आहेत.

अतिवृष्टीग्रस्त आणि नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. गेल्या चार- पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जावली तालुक्यातील केळघर येथील ओढ्यावरील वाहून गेलेला पूल यासह रेंगडीवाडी येथे पुरात चारजण वाहून गेले याठिकाणी भेट दिली. तसेच पुनवडी येथील वाहून गेलेला पूल, आंबेघर येथील शेतीचे नुकसान आदी भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना धीर देऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना त्यांनी केल्या. रेंगडीवाडी येथील दुर्घटनेला जबाबदार असणारांवर कारवाई करण्याबरोबरच मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: