गोवा 

‘सरकारवर टीका करण्याऐवजी काम करून दाखवा’

पणजी :
मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी वारंवार सरकारवर टीका करण्याऐवजी आपल्या मतदारसंघात लक्ष घालावे. ऑनलाईन शिक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर इंटरनेट नेटवर्कविषयी सरकारला घेरण्याऐवजी त्यांनी आपल्या मतदारसंघात ही अडचण येऊ नये यासाठी काय केले ते सांगावे, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी केला आहे.

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये आदी अनेक शैक्षणिक उपक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. राज्यातील शहरांसह ग्रामीण आणि दुर्गम भागातही शिक्षणाची गंगा वाहती राहावी यासाठी कोविडच्या काळातही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑनलाईन शिक्षणास प्राधान्य दिले. आणि शाळा, अभ्यासक्रम सुरू केले. राज्यातील काही भागात नेटवर्कची समस्या आहे, हे मान्य पण लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदार, खासदार यांचीही काही जबाबदारी असते. अशी कोणतीही जबाबदारी किंवा कर्तव्य ढवळीकरांनी पार पाडल्याचे ऐकिवात नाही. यापूर्वी राज्यात उभारल्या जाणार्‍या मोबाईल टॉवरला विरोध करणार्‍या लोकांची समजूत काढण्याऐवजी विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत राहिल्याने ही परिस्थिती आल्याचे शेट-तानावडे यांनी म्हटले आहे.

विद्यमान सरकारने आता राज्यातील नेटवर्क वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी टॉवर उभारणीसाठी परवानगी दिली आहे. तसेच काही टॉवर उभेही राहिले आहेत. नेटवर्कची समस्या हळुहळू कमी होत आहे. भविष्यात ती आजिबात राहणार नाही. तरीही केवळ विरोधासाठी विरोध म्हणून आमदार ढवळीकर सरकारवर टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे मंत्री, आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, पदाधिकारी आणि नेते राज्यातील विद्यार्थ्यांना साहाय्यासाठी पुढे आले आहेत. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पदरमोड करून विद्यार्थ्यांना मोबाईल वाटप, शिक्षण साहित्याचे वाटप आदी उपक्रम राबवून दिलासा दिला आहे. आमदार ढवळीकरांनी मगोच्यावतीने असा कोणताही उपक्रम राबवला तर नाहीच उलट सरकार करत असलेल्या उपक्रमांवर टीका करण्याचे काम केले. यासाठी ढवळीकरांनी राज्य सरकार किंवा भाजपवर टीका करण्यापूर्वी त्यांच्या मतदारसंघात काय केले हे सांगावे, असे आव्हान शेट-तानावडे यांनी दिले.

दरम्यान, कुंभारजुवेचे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांनी आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना नेटवर्कची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे. तसेच मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आज आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वायफाय सुविधेचे उद्घाटन केले. मोरजी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोरजीच्या सरपंच वैशाली शेटगावकर, पंच सदस्य उमेश गडेकर, तुषार शेटगावकर, सुप्रिया पोके, प्रकाश शिरोडकर, पवन मोरे, विलास मोर्जे, मांद्रे भाजप मंडळाचे सचिव सुदेश सावंत, रोटरी क्लब पर्वरीचे अध्यक्ष सागर गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: