गोवा 

काँग्रेसने केली राज्य सरकार बरखास्तीची मागणी

पणजी :
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन राज्यासंदर्भातील विविध मुद्यांचा उहापोह करणारी दोन निवेदने त्यांना सादर केली, तसेच मोदी सरकारच्या आशीर्वादाने झालेल्या ‘पिगॅसस हेरगिरी’ची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींकडे केली. राज्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार राज्याचे हित जपण्यास आणि गोमंतकियांचे रक्षण करण्यास अपुरे पडल्याचा ठपका ठेवत सदर सरकार त्वरित बरखास्त करावे अशी आग्रही मागणी यावेळी राज्यपालांकडे कॉंग्रेस शिष्टमंडळाने केली.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये एक निवेदन देशाच्या राष्ट्रपतींच्या नावे असून, यामध्ये ‘पिगॅसस’च्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी हि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी असून, या हेरगिरी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार आग्नेलो फर्नाडिस, महिला काँग्रेस अध्यक्षा बिना नाईक, युवा काँग्रेस अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, सेवा दल प्रमुख शंकर किर्लपारकर, एनएसयुआय अध्यक्ष नौशाद चौधरी यांचा समावेश होता.

गोव्यातील पूरग्रस्त भागाचा राज्यपालांनी ताबडतोब दौरा करावा जेणेकरुन सरकारी यंत्रणा जागी होणार व लोकांना काहितरी मदत होणार असे राज्यपालांना सांगितल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.

गोव्याची अस्मिता सांभाळण्यासाठी तसेच गोमंतकीयांचे कश्ट कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे केल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले.

गोव्याचे राज्यपाल म्हणून राज्याच्या घटना प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाच्यावतीने आणि जनतेच्या वतीने श्रीधरन पिल्लई याना काँग्रेसकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

राज्यपालांना दिलेल्या निवेदनात कोविड महामारीच्या जोडीला राज्यशासनाच्या गैरनियोजनामुळे राज्याची एकूण झालेली आर्थिक विपन्नावस्था, राज्यात कायदा सुव्यवस्थेला फासलेला हरताळ अशा कठीण काळात राज्याचे प्रमुख म्हणून सूत्रे सांभाळताना आपल्यासमोर अनेक अडथळे आहेत. राज्यामध्ये सध्यस्थितीत पर्यावरण, जंगले, वन्यजीव आणि एकूण गोव्याच्या हितालाच धोका निर्माण झाला आहे. राज्यसरकारच्या अयशस्वी आणि असंवेदनशील राज्यकारभारामुळे जनतेच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले असून, त्यांना जगण्याबद्दल आणि जगण्याच्या प्राधान्यक्रमाबद्दलच साशंकता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्याचे घटना प्रमुख या नात्याने आपण या सगळ्या दुविधांवर सकारात्मकरित्या मार्ग काढून राज्यातील जनतेच्या दुःखावर फुंकर घालावी, असे निवेदनात यावेळी काँग्रेसने म्हटले आहे.

कॉंग्रेस पक्षाने राज्यपालांना देण्यात आलेल्या नऊ पानी निवेदनामध्ये प्रामुख्याने ढासळलेली अर्थव्यवस्था, असंवेदशीलतेने हाताळलेली कोविड परिस्थिती, पर्यावरणाचा मुद्दा, ऐरणीवर आलेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्यात सरकारचे अपयश, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अपयश, भ्रष्टाचार, अर्थहीन प्रशासकीय कारभार, आणि भाजप सरकारने केलेला लोकशाहीचा खून यावर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे.

गोव्याचे कोळसा हबमध्ये होत असलेले रूपांतर, किनारी भागातील रहिवाशांची सीझेडएमपीवर झालेली दडपशाही आणि भाजपच्या ‘क्रोनी क्लब’कडे गोव्याचे हस्तांतरण करण्याचा राज्य सरकारचा डाव, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू, इव्हर्मेक्टिन गोळ्यांचा घोटाळा, म्हादई नदीचे संरक्षण करण्यात सरकारचे अपयश, खाण व्यवसाय पुन्हा सुरु करण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, त्याचप्रमाणे कोलमडलेला पर्यटन व्यवसाय तसेच राज्यात गुन्हेगारांना मिळालेली मोकळीक आदी विषयांवर या निवेदनातून  राज्यपालांचे विशेष लक्ष वेधण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: