गोवा 

‘मुली रात्रभर बाहेर का होत्या?’

बाणावली प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा उफराटा सवाल 

पणजी :

25 जुलैच्या रात्री बाणावली समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळे गोव्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद गोवा विधानसभेत देखील उमटले आहेत. या प्रकरणावरून गोवा विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद आता निर्माण झाला आहे. जेव्हा १४ वर्षांच्या अल्पवयीन मुली रात्रभर बीचवर असतात, तेव्हा पालकांनी त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. या मुली रात्रभर बाहेर का होत्या? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पीडितांच्या पालकांना केला आहे. त्यांच्या या विधानावर विरोधी पक्षांसह सर्वसामान्यांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे.

मुलांची जबाबदारी ही पालकांची जबाबदारी आहे, अशी देखील भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. आपल्या मुलांची सुरक्षितता ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांनी आपल्या मुलांना, विशेषत: अल्पवयीन मुलींना रात्री बाहेर राहू देऊ नये, असे मुख्यमंंत्र्यांनी पालकांना सूतोवाच केलं. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांकडे राज्याच्या गृहमंत्रीपदाची सूत्रं आहेत.

दरम्यान, बाणावली बलात्कार प्रकरणात सहभाही असलेल्या सरकारी कर्मचारी राजेश माने (वय वर्षं, ३३) याला सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधानसभेत दिली आहे. गोवा फॉरवर्डचे नेते तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारी गोवा विधानसभेत गोंधळाचं वातावरण पहायला मिळालं. मुख्यमंत्री आणि विजय सरदेसाईंमध्ये या प्रकरणावरून चांगलीच खडाजंगी झाली होती.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: