गोवा 

‘त्या’ वक्तव्यावरून कॉंग्रेसने डागली मुख्यमंत्र्यांवर तोफ 

पणजीः
गोव्यातील बलात्कार प्रकरणास मुली आणि त्यांचे पालक जबाबदार असल्याचे लज्जास्पद विधान करून भाजप सरकारचे सदोष मुख्यमंत्री डाॕ. प्रमोद  सावंत यांनी राज्यातील जनतेला संरक्षण देण्यास ते असमर्थ असल्याचे सिद्ध केले आहे, असा दावा गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज येथे केला.

 

‘किशोरवयीन मुलांच्या पालकांनी त्यांची मुलं बीचवर अंधाऱ्या रात्री काय करतात याचे परिक्षण केले पाहिजे, मुली रात्री समुद्रकिनाऱ्यावर काय करतात हे बघितले पाहिजे’, असे वादग्रस्त विधान मुख्यमंत्री सावंत यांनी केल्याने  त्यांच्यावर टीका होत आहे. त्याचा समाचार घेताना चोडणकर म्हणाले, मुख्यमंत्री सावंत यांच्या या विधानाने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ ही भाजपची मोहीम खोटी असल्याचे सिद्ध होत आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी यांनी महिला, संरक्षण प्रमुख, घटनात्मक अधिकारी यांच्यावरील हेरगिरी थांबवून समाजकंटक, गुन्हेगार आणि माफियांवर पाळत ठेवून जनतेला भयमुक्त करावे. पण ते करण्याऐवजी केंद्राप्रमाणेच राज्यातील भाजप सरकार स्वतःच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी असल्याचे दाखवून देत आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली.

या बेजबाबदार सरकारने दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लादला आहे. संपूर्ण राज्य कोविडमुळे संचारबंदीत ठेवले आहे. तरीही राज्यात कथित निगराणीतही बलात्कार, खून, दरोडे रोज वाढतच चालले आहेत. भाजप सरकारने गुन्हेगार माफिया, ड्रग्स माफिया व भिकारी माफियांना रान मोकळे सोडून राज्याला गुन्हेगारीचे नंदनवन बनविले असल्याची टीका चोडणकर यांनी केली.

भारतासारख्या लोकशाही देशात कोणाही नागरिकांना हव्या त्या वेळेत मुक्तपणे फिरण्याचा मुलभूत अधिकार आहे. नागरिकांचे संरक्षण करणे ही प्रत्येक सरकारची जबाबदारी असते. असे असताना मुख्यमंत्री मात्र बाणावलीत बलात्कार घडलेल्या ‘त्या’ दोन पिडीत मुली व त्यांच्या पालकांना दोष देणारे लज्जास्पद विधान करतात. प्रशासनावरील ताबा त्यांनी गमावल्याचे हे लक्षण असल्याची टीका चोडणकर यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, या बलात्कार प्रकरणात सरकारी कर्मचारी सहभागी असल्याचे वास्तव आहे. यावरून समाजकंटकांच्या व गुन्हेगारांच्या मनात कसलाही धाक राहिला नाही, हे सिद्ध होत आहे. या बलात्कार प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी एक वरिष्ठ मंत्री व एक ज्येष्ठ भाजप नेता प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे.​​

या घृणास्पद गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोषींची गय न करता त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. या गुन्ह्यातील कोणाही सहभागीला वाचविण्याचे प्रयत्न झाल्यास काँग्रेस ते मुळीच सहन करणार नाही, असा इशारा चोडणकर यांनी दिला.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: