सातारा 

‘तुमचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत’

​सातारा (महेश पवार) :

महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक  ठिकाणी नुकसान झाले असले व अनेक ठिकाणी पूर आला असला तरीही जावळी तालुक्यातील डोंगर कपारीत व दऱ्या-खोऱ्यात राहणारा शेतकरी या प्रकोपामुळे पुरता उध्वस्त झाला आहे.आपल्या काळ्या आईची सेवा करणारा व याच्यावरच उदर निर्वाह असलेला शेतकरी वर्ग या अस्मानी संकटाने नैराशाच्या गर्तेत अडकला असून यांचे दुःख समजून घेण्यासाठीच आम्ही आलो असून मदत फक्त एक निमित्त असल्याचे मत जेष्ठ कीर्तनकार व व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांनी वाहिटे ता.जावली येथे बोलताना सांगितले.

अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापुर,चिपळूण,महाड,​ ​रत्नागिरी या शहरात दरवर्षी प्रमाणेच पुराचे पाणी भरले. पण या वर्षी निसर्गाचा झालेल्या प्रकोपामूळे​ डोंगरी भागात रहाणार्‍या शेतकरी वर्गाला मात्र याचा मोठा फटका बसला आहे. तळीये(महाड),पाटण,वाई भागात डोंगर खाली येवून काही गावेच उध्वस्थ झाली आहेत.यामधे जिवीत हानीही झाली.जावली तालुक्यातही ६ लोकं वहावून गेले असून बोंडारवाडी ते आंबेघर व केळघर ते वाहिटे-रेंगडी या गावातील शेतकर्‍यांची अपरिमीत हानी झाली असून संपूर्ण शेतीच उध्वस्थ झाली असून गावागावातील विहीरी गाडल्या गेल्या आहेत.मोटरी वहावून गेल्या आहेत.डोंगर तुटून खाली आलेले अजस्त्र दगड मशिनला सुध्दा हलेना झालेत.लाईट नाही,पिण्याचे पाणी नाही,संपर्कासाठी मोबाईलला रेंज नाही अशा या डोंगरी भागातील​ ​शेतकर्‍यांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी गुरूवर्य बंडातात्या कराडकर व व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते या भागात पोहचले.

वाहिटे गावातील नुकसानीची पहाणी करण्यात आली. यावेळी जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ, मेढा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. अमोल माने, जावली वारकरी संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण महाराज शिंदे,विजयमहाराज शेलार, विलासबाबा जवळ,बजरंग चौधरी,राजेंद्र जाधव,दिपक महाराज,नंदु जगताप तसेच महाराष्ट्रातून आलेले व्यसनमुक्त संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी या भागात अतिवृष्टीमीळे झालेल्या नुकसानीची माहिती व मदत कार्याची माहिती दिली. मी पलुस तालुक्यात असताना व्यसनमुक्त संघाने २०१९ साली बुर्ली गाव दत्तक घेतल्याचा उल्लेख करून संघाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी स.पो.नि. अमोल माने यांनीही आदरणिय तात्या व  व्यसनमुक्त युवक संघ मदतीसाठी येथे पोहचल्याबद्दल आभार मानले.

बंडातात्या कराडकर यांनी  इथल्या शेतकर्‍यांना धीर देत बोलत असताना इथली भयानक परस्थिती पहावून मात्र त्यांच्याच अश्रुचा बांध फुटला, हे दुःख इतके मोठे आहे की,तुमचे अश्रु कोणीच पुसू शकत नाही पण तुम्हांला जिद्दिने सावरायलाच हवे व पुन्हा उभे रहायलाच हवे.

या भागातील गरिब व गरजू मुलांना राष्ट्रबंधु राजीवजी दिक्षित गुरूकुल मधे मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही स्विकारत आहोत. वाहिटे,बाहुळे,भूतेघर व बोंडारवाडी या गावात आम्ही मदत दिली असली तरी ही मदत पुरेशी नाही. समाजातील लोकांनी पुढे येवून या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात द्यावा असे आवाहन ही कराडकर यांनी यावेळी केले.

या प्रसंगी सर्वच गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी इलेक्ट्रीक मिडीया आमच्या पर्यंत न पोहचल्याने आमच्या नुकसानीची दाहकता व गंभीरता सरकार दरबारी न पोहचल्याची खंत व्यक्त केली. सरकारचा एकही मंत्री या भागात अजून पोहचला नसल्याचे सांगून आमची शेती गाडली गेली पण माणसे  शाबुत असल्यानेच त्यांचे या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: