देश-विदेश

मंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम

कोलकाता:
भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली आहे. तसेच त्यांनी खासदारकीचा राजीनामाही दिला आहे. मोदी सरकारच्या विस्तारात सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.

बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहेत. सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. अलविदा… मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस, सीपीआयएम या पैकी मला कुणीच बोलावलं नाही. मी कुठेच जात नाही. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकीय पक्षाची गरजच नाही, असं सुप्रियो यांनी म्हटलं आहे.

राजकारणापासून वेगळे झाल्यानंतरही आपलं उद्देश पूर्ण करता येतं, असं त्यांनी सांगितलं. तसेच आपण कायम भाजपच्या विचारधारेशी बांधिल राहू असंही त्यांनी म्हटलं आहे. माझा हा निर्णय ‘ते’ समजून घेतील, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसापासून बाबुल सुप्रियो भाजपमध्ये फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेक प्रश्न केले जात होते. ते काही तरी मोठा निर्णय घेतील असं बोललं जात होतं. त्यांनी फेसबुक पोस्टवरून त्यांच्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. पक्षासोबत आपले काही मतभेद होते. निवडणुकीपूर्वीच या गोष्टी सर्वांच्या समोर उघड झाल्या होत्या. पराभवाची मीही जबाबदारी घेत आहे. परंतु, त्याला दुसरे नेतेही जबाबदार आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मला केव्हाच पक्ष सोडायचा होता. बऱ्याच दिवसांपासून मनात हे घोळत होतं. आता राजकारणात राहायचं नाही, असं मनानं ठरवलं होतं. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामुळे मी प्रत्येकवेळी निर्णय मागे घेतला. आता तर काही नेत्यांशी झालेले वाद उघड झाले आहेत. त्यामुळे अशा वेळी राजकारणात राहणं योग्य नसल्याचं वाटलं. त्यामुळेच राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: