मुंबई 

अभिमान वाटेल अशा पद्धतीने होईल बीडीडीवासियांचे पुनवर्सन’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
मुंबईतील वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प हा रहिवाशांची चांगल्या घरासंदर्भातील स्वप्नं, आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करणारा आदर्श प्रकल्प असेल. मुंबईतील प्रत्येक चाळवासीयाला आपलंही अशा पद्धतीच्या घरात पुनर्वसन व्हावंसं वाटेल. महाविकास आघाडी सरकारलाही अभिमान वाटेल, अशा पद्धतीनं हा प्रकल्प राबवून वेळेत पूर्ण केला जाईल”, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी बीडीडी चाळवासियांचं अभिनंदन केले आहे. पुनर्वसन इमारतींचं बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी म्हाडा आणि रहिवाशांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या इमारतींच्या बांधकामांचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

महाविकास आघाडीच्या या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला असून वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना नवीन टॉवरमधील घरांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचं प्रमुख केंद्र असलेल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली स्नेह, आपुलकीची भावना, मुंबईतील चाळसंस्कृती, नव्या टॉवरमध्ये व पुढच्या पिढीमध्येही कायम राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या मान्यवरांनी, महाराष्ट्रातल्या असंख्य राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी, लेखकांनी, खेळाडूंनी, कलावंतांनी मुंबईतील चाळसंस्कृतीत राहूनच राज्याच्या प्रगतीत योगदान दिलं. मुंबईतील चाळसंस्कृती हे राज्याचं सामाजिक, सांस्कृतिक वैभव असून या सांस्कृतिक वैभवातला स्नेहभाव नव्या टॉवरसंस्कृतीतही जपला जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: