गोवा 

भाजपच्यावतीने ​राष्ट्रीय आरोग्य स्वयंसेवक अभियान

​पणजी :

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या ​​राष्ट्रीय आरोग्य स्वयंसेवक अभियान आणि आरोग्य स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्याच्या उपक्रमाचा शनिवार दि. 7 रोजी शुभारंभ हो​त आहे. सुप्रसिद्ध ऍन्कॉलाजिस्ट तथा भाजपच्या वैद्यकीय विभागाचे संयोजक डॉ. शेखर साळकर यांच्या नेतृत्वाखालील चार डॉक्टरांच्या पथकात एकूण 60 डॉक्टर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. डॉ. साळकर आणि त्यांचे पथक नुकतेच दिल्ली येथून यासंबंधीचे प्रशिक्षण घेऊन आले आहेत.

शनिवारी या उपक्रमाअंतर्गत सुमारे 20 डॉक्टरांची पहिली तुकडी एक दिवसाचे प्रशिक्षण देणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे आणि खासदार विनोद सोनकर उपस्थित असतील. 15 ऑगस्ट रोजी उर्वरित 40 डॉक्टरांना 20 प्रशिक्षित डॉक्टर प्रशिक्षण देतील. सत्रांमध्ये कोविड – 19, लसीकरणाविषयी संकल्पना आणि सामान्य ज्ञान समाविष्ट असेल. तर इतरांमध्ये योग्य आहार आणि योगाद्वारे रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवायची याचे प्रशिक्षण देखील असेल.

कोविड -19 च्या तिसर्‍या लाटेचा उद्रेक झाल्यास लोकांना आणि प्रशासनाला मदत करता यावी यासाठी संपूर्ण देशातील भाजपच्या कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

या मोहिमेविषयी प्रदेशाध्यक्ष शेट – तानावडे यांनी सांगितले की, प्रशिक्षित डॉक्टर बूथस्तरीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. प्रत्येक बूथमधून दोन तरुण (पुरुष आणि महिला) मोहिमेसाठी निवडले जातील. प्रशिक्षित कार्यकर्ते जागृती करण्यासाठी आणि आवश्यक ती माहिती गोळा करण्यासाठी विविध गावांना भेट देतील. प्रशिक्षण घेतलेले सज्ज स्वयंसेवक इतरांना मदत करू शकतील.

या उपक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन लोकांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. ऑक्सिजन पातळी तपासली जाईल. तसेच मूलभूत वैद्यकीय मदत पुरवली जाईल, अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिली. हे स्वयंसेवक डॉक्टर म्हणून नव्हे तर आरोग्य सेवा देणारे कार्यकर्ते म्हणून कार्यरत असतील.

कोविड -19 विरूद्धच्या लढाईबाबत भाजप अत्यंत गंभीर आहे. हा कार्यक्रम आरोग्याभिमुख आहे. कोविड -19 हे आमचे मुख्य लक्ष्य आहे. आणि आमचे लक्ष्य लवकर निदान आणि शक्य तितके कमी मृत्यू असे असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले.

शेट-तानावडे म्हणाले की, पक्षाने राज्यभर राबवल्या जाणार्‍या या उपक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी डॉ. साळकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा स्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात डॉक्टर आणि आयटी तज्ज्ञांचा समावेश आहे. पक्षाचे प्रवक्ते तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि प्रवक्ते शर्मद रायतुरकर हे देखील प्रशिक्षण उपक्रमाचा सक्रिय भाग आहेत.​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: