गोवा 

आपेव्हाळ-प्रियोळ येथे कदंब बसला अपघात

फोंडा: 
फोंड्याहून वळवईला निघालेल्या कदंब बसगाडीला आपेव्हाळ – प्रियोळ येथे अपघात होऊन चौघेजण जखमी झाले. यातील एका जखमीला पुढील उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले असून तिघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी पावणे आठच्या दरम्यान घडला.

फोंड्याहून वळवईला जाताना कदंबच्या या बसगाडीत फक्त सहाच प्रवासी होते. आपेव्हाळ येथे पोचल्यावर अचानकपणे आडव्या आलेल्या गुरांमुळे वाहनचालकाचे नियंत्रण गेल्याने बसगाडी रस्त्याच्या बाहेर गेली व कुंपणाला धडकून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेल्या गटारात एका बाजूने कलंडली. अपघातात वीज खांबाला बसची धडक बसल्याने दर्शनी भागाची मोठी हानी झाली.

या अपघातात धनश्री नाईक (वय ३०) आडपई – दुर्भाट, मेघन सावंत (वय ५२) केपे तसेच बसवाहक सुषमा गावडे (वय ४२) तामसुली – खांडोळा व चालक प्रकाश साळुंके (वय ३२) जखमी झाले. त्यातील धनश्री नाईक हिला जबर मार बसल्याने तिला बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले असून उर्वरित तिघांना घरी पाठवण्यात आले.

दरम्यान, फोंडा – दुर्भाट मार्गावर कपिलेश्‍वरी – कवळे येथे काल मध्यरात्री रस्त्यावर बसलेल्या गाईला धडकून दुचाकीला अपघात झाला. या अपघातात गाय जागीच गतप्राण झाली तर दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले. दोन्ही अपघातप्रकरणी फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: