गोवा 

‘राज्यातील भ्रष्ट्राचाराचे संपुर्ण उच्चाटन करणार’

मडगाव :
२०२२ मध्ये गोव्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कॉंग्रेस पक्ष कालबद्ध सेवा कायद्याची अमलबजावणी करुन व प्रभावी लोकायुक्त कायदा आणुन राज्यातील भ्रष्ट्राचाराचे संपुर्ण उच्चाटन करणार आहे व देशातील आदर्श राज्य म्हणुन गोव्याला ओळख मिळवून देणार आहे अशी घोषणा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त राष्ट्रीय काँग्रेसप्रणित, मडगाव येथे दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीने आयोजित केलेल्या ‘स्वतंत्र सेनानी – शाहिद सन्मान दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, नावेलीचे आमदार लुईझीनो फालेरो, खासदार फ्रांसिस सार्दिन, कॉग्रेसचे उपाध्यक्ष एम के शेख, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, विठोबा देसाई, पिटर गोम्, ॲड. येमेनी डिसोजा, जॉन पेरेरा, अविनाश शिरोडकर, जिल्हा कॉंग्रेस व विवीध गट समितींचे पदाधिकारी हजर होते.

स्वातंत्र्य सैनीक गोपाळ चितारी, रमाकांत केसरकर, ॲंथनी फर्नांडिस, वामन प्रभूगांवकर व रामा बुधोळकर या स्वातंत्र्य सैनीकांचा यावेळी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी गोवा कायदा आयोगाचे अध्यक्ष असताना प्रभावी अशा गोवा लोकायुक्त विधेयकाचा मसुदा तयार केला होता. पण, तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी सदर विधेयक शितपेटीत टाकले. तेच विधेयक मागच्या विधानसभा सत्रात आमचे नेते दिगंबर कामत यांनी परत एकदा मांडले होते. परंतु डॉ.प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट भाजप सरकारकडे विधेयकावर चर्चा करण्याची आणि मंजूर करण्याची हिंमत नसल्याने सदर विधेयकाला त्यानी कामकाजात दाखलच करुन घेतले नाही असे गिरीश चोडणकर यांनी नमूद केले.

आम्ही आता कायदेशीर तज्ञ तसेच स्वयंसेवी संस्थांकडून अधिक सूचना घेऊन गरज पडल्यास लोकायुक्त कायदा अधिक मजबूत करणार आहोत. कालबद्ध सेवा देण्यावरही आमचे सरकार भर देणार असुन त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालणे सोपे होणार आहे असे गिरीश चोडणकर म्हणाले.

आज देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करीत असताना गोव्याची अस्मिता व वारसा जपण्यासाठी आम्ही पूढे आले पाहिजे. लोकशाही मुल्यांचा आदर करणे हीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व दिलेल्या स्वातंत्र्यसैनीकांसाठी खरी मानवंदना ठरेल असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत म्हणाले. भाजप सरकार लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे असे त्यानी पूढे बोलताना सांगितले.

स्वातंत्र्य सैनीकांच्या लढ्यानेच देशाला मुक्ती मिळाली व स्वातंत्र्याची फळे आज आपण चाखत आहोत. गोव्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही पूढे येणे गरजेचे असल्याचे नावेलीचे आमदार लुईझीनो फालेरो म्हणाले.

खासदार फ्रासिंस सार्दिन यांनी यावेळी बोलताना स्वातंत्र्य सैनीकांच्या त्यागाचे स्मरण केले. आज देशात भाजप सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचे सांगुन, भाजप लोकभावनांचा आदर करीत नसल्याचे ते म्हणाले.

मडगावच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, नगरसेवक सगुण नायक, दामोदर शिरोडकर, शिवानी पागी, अविता नाईक, दीपक खरंगटे व इतर यावेळी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: