सातारा 

सह्याद्रीवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे खलबते सुरू?

उमेदवारीसाठी सहकार मंत्र्यांना अनेकांचे साकडे

कराड (अभयकुमार देशमुख) :
गेली वर्षभर सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे रखडलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे. सहकार क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळवून देशात अग्रेसर असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्षलागून राहिले आहे. या बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी अनेकांनी आपले देव पाण्यात घातले असून उमेदवारी बाबतची खलबते राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सह्याद्री कारखान्यावर सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून इच्छुक कार्यकर्ते उमेदवारीसाठी सहकार मंत्र्यांना भेटत असल्‍याचीही माहिती मिळाली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्‍वाखाली बाळासाहेब पाटील यांनी गेली 25 वर्षे  सहकार क्षेत्रापासून राजकारणास सुरुवात केली. स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. पी. डी. पाटील साहेब यांच्याकडून सहकाराचे बाळकडू मिळालेल्या ना.बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या तत्त्वानुसार सह्याद्री सहकारी साखर कारखाना उत्तम चालविला आहे. सातारा जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उभारणीत व तिचा देशात नावलौकिक होण्यात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्वातंत्र्य सेनानी स्व.किसनवीर आबा यांचे मोठे योगदान आहे. या बँकेच्या उभारणीपासूनच ही परंपरा कायम ठेवूनच वाटचाल चालू आहे. त्यामुळे या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अचूक नियोजन व पारदर्शक कारभाराचा फायदा होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उमेदवारी मिळणेसाठी सहकार मंत्री महोदयांकडे एक महिन्यापूर्वीपासून अनेक कार्यकर्ते संपर्कात राहून मागणी करत आहेत. दरम्यान  सोसायटी मतदार संघातून प्रत्येक तालुक्यातून एक प्रतिनिधी, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघातून एक प्रतिनिधी, दोन महिला प्रतिनिधी, भटक्या विमुक्तमधून एक प्रतिनिधी आणि अनुसूचित जाती-जमाती मधून एक प्रतिनिधी, कृषी उत्पादन प्रक्रिया संस्थांमधून एक, नागरी बँका व विविध संस्थांमधून एक, गृहनिर्माण दूध उत्पादक व इतर संस्थांमधून एक, औद्योगिक ग्राहक संस्था व पाणीपुरवठा आदी संस्थांमधून एक व इतर मागासवर्गीय मधून एक असे एकूण २१ प्रतिनिधींची निवड केली जाणार असून जिल्हयातील सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांनी नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे उमेदवारी मिळणेसाठी संपर्क चालू ठेवला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील राजकारण नेहमीच सहकारावर अवलंबून राहिले आहे. स्व. यशवंतरावजी चव्हाण  व स्व. वसंतदादा पाटील, जेष्ठ नेते शरद पवार यांनी सहकाराचा पाया घातल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आर्थिक क्रांती होऊन लोकांना रोजगार उपलब्ध झाल्‍याने सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे.

त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सहकाराला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून जिल्ह्यात असणाऱ्या विविध सहकारी संस्थांच्या भोवती राजकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सहकाराचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सहकार मंत्री  बाळासाहेब पाटील हे सर्व प्रमुख जेष्ठ नेत्‍यांना बरोबर घेवून राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानेच अजित पवार, रामराजे नाईक निंबाळकर, जयंतराव पाटील, सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक करून सहकार मंत्री म्‍हणून जिल्‍हयातील सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते व जेष्‍ठांना तसेच सहकारातील धुरीनांना सोबत घेवून सातारा जिल्हा बँकेची निवडणूक ही निर्विवादपणे पार पाडण्याचा कल बाळासाहेब पाटील यांचा दिसून येतो. अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आढळून येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: