मुंबई 

‘राणे यांचे ‘ते’ वक्तव्य हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य समजावे लागेल’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :

केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकर खुलासा करावा नाहीतर राज्यात व देशात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजपचे लोक लागले आहेत असे चित्र निर्माण होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता वरील वक्तव्य केले आहे.

नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणुक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन राज्याला व देशाला कळली असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय अशा शेलक्या शब्दात जयंत पाटील यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला.

अशा पध्दतीने बोलणार्‍या लोकांना प्रत्येक राजकीय पक्षांनी किती महत्त्व देणं यावर विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला भले राग असेल किंवा भाजपला उध्दव ठाकरेंचा द्वेष असेल, राग असेल तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही. दुर्दैवाने ही भाषा वापरली त्याबद्दल जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील यांना जास्त मनावर घेत जाऊ नका. दोन वर्षे ते राजकीय बदल होणार हेच सांगत आहेत. त्यामुळे तुम्हीच तुमचं टीआरपी टिकवायचं असेल तर चंद्रकांत पाटील यांना किती महत्त्व द्यायचे हे ठरवा अशी विनंती जयंत पाटील यांनी माध्यमांना केली.

जनतेने निवडलेल्या मुख्यमंत्र्यांचा हा अपमान असून ज्यावेळी मुद्दे संपतात त्यावेळी माणसं गुद्दयावर येतात. भाजपचे मुद्दे संपलेले आहेत हे यावरून स्पष्ट दिसत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: