गोवा 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह

पेडणे​ :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंगळवार दि. 24 रोजी मांद्रे मतदारसंघाचा दौरा केला. चोपडे-शिवोली पुलावर मुख्यमंत्र्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष दिसून आला.

 

मुख्यमंत्री जमलेल्या लोकांना हात हलवून अभिवादन करत होते. यानिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. रॅली चोपडेमार्गे मोरजी, आश्‍वे, मांद्रे व्हाया हरमल, पालये, केरी अशी काढण्यात आली. या दौर्‍यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी मांद्रे मतदारसंघात अनेक विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि नवीन कामाचा शुभारंभ केला.

 

चोपडे जंक्शन ते मोरजी खिंड पर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण कामाची सुरुवात माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या काळात झाली. आणि अंदाजे 90 टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित काम आमदार दयानंद सोपटे यांच्या कारकिर्दीत पूर्ण करण्यात आले. उर्वरित कामाचा आणि सायकल ट्रॅकचा शुभारंभ करण्यात आला. परिसर रंगरंगोटी करून विद्युत रोषणाईने उजळून गेला होता.

 

यावेळी आमदार दयानंद सोपटे, मांद्रे भाजपा मंडळाध्यक्ष मधु परब, महिला मोर्चा अध्यक्षा दीपा तळकर, अनिशा केरकर, महिला अध्यक्षा नयनी शेटगावकर, राज्य महिला उपाध्यक्षा एकता चोडणकर, प्राजक्ता कन्नाईक, पार्से सरपंच प्रगती सोपटे, मोरजीचे माजी सरपंच धनंजय शेटगावकर, माजी सरपंच अनंत गडेकर, बाबली राऊत, एकनाथ चोडणकर, दर्शन राऊत, मंदार पोके, श्रुती केरकर, मिलिंद तळकर, रोहन केरकर, गंगाराम मठकर, शांताराम परब, संतोष कोरखणकर, दत्ताराम ठाकूर, शरद पार्सेकर, संतोष पार्सेकर, मनोहर म्हमाल, गोविंद आजगावकर, महेश मांद्रेकर, धीरज मांद्रेकर, विजेश मांद्रेकर, शैलेंद्र परब, प्रदीप परब, उमेश परब, सुनील परब सुहास नाईक, जयराम नाईक, गुणाजी हरमलकर, सचिन गडेकर, अजित मोरजकर, मधु होळकर, प्रेमनाथ कानोळकर, प्रवीण पेटकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे संचालक सुदेश सावंत आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

भारतीय जनता पार्टीचा विजय असो, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा विजय असो, आमदार सोपटेंचा विजय असो, दयानंद भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्वदेश दर्शन योजनेंतर्गत चोपडे जंक्शन ते मोरजी खिंड पर्यंतच्या सायकल ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खिंड – मोरजी येथे प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्री मोरजाई देवी व देव सत्पुरुष देवाचे दर्शन घेतले.

 

दरम्यान, तेरेखोल गावाला महाराष्ट्रातून वीज दिली जाते. गोवा मुक्तीच्या सुमारे 60 वर्षांनंतर गोवा सरकारकडून या गावाला वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नदीतून भूमिगत वीज केबल घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

हरमल ते भूमिका हायस्कूल पालये पर्यंतचे पदपथ, विद्युत रोषणाईचेही उद्घाटन करण्यात आले. नंतर हरमल येथे सार्वजनिक गणेश मंडळ सभागृहात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. नंतर मांद्रे येथील सिद्धारूढ मठ परिसराचे 2 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. शिवाय भगवती सप्तेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणाचे पूर्ण झाल्याने याचे देवस्थान समितीकडे लोकार्पण करण्यात आले.

 

यावेळी तुये येथील दीनदयाळ सभागृहाचेही उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पार्से येथील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कुलदेवता आणि आमदार सोपटे यांची ग्रामदेवता श्री भगवती मंदिराचे सुशोभीकरण केले होते. याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
दरम्यान, आज मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी पेडणे मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: